Pune: दौंडच्या यवतमध्ये तणाव का निर्माण झाला? CM फडणवीसांनी सांगितले कारण
Tv9 Marathi August 02, 2025 01:45 AM

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत या गावात दोन गटात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या तणावामुळे यवतमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैणात करण्यात आला आहे. जमलेल्या जमावाला हटवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्याचीही माहिती समोर आली आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा तणाव का निर्माण झाला याबाबत माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमधील घटनेवर बोलताना म्हटले की, मी या घटनेबाबत माहिती घेतली आहे. त्या ठिकाणी एका बाहेरच्या व्यक्तीने कुठल्यातरी पुजाऱ्याने बलात्कार केला असं स्टेटस ठेवल्याने हा तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकं रस्त्यावर आली, जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्जही करावा लागला. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. दोन्ही समाजाची लोकं एकत्र बसलेली आहेत, तणाव कमी करण्याचे काम सुरु आहे. जाणीवपूर्वक असा तणाव निर्माण करण्याचे काम केलं जात आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

यवतमधील काही व्हिडिओ समोर आले होते, यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, यवतमध्ये आता शांतता आहे. समोर आलेले व्हिडिओ यवतमधील आहेत की बाहेरील आहेत हे बघावं लागेल. अशा प्रकरणांमध्ये बाहेरचे व्हिडिओ दाखवले जातात. याची चौकशी केली जाईल. मी लोकांना शांतता राखण्याचे आणि कायदा हातात न घेण्याचे आवाहन करतो.

दौंडचे आमदार राहुल कूल यांनी याबाबत बोलताना सांगितले की, यवतमध्ये गेले दोन तीन दिवस तणावपूर्ण वातावरण होतं. सर्वांशी संपर्क करुन तणाव निवळण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु होते. आता तिथे जमाव जमला आहे, त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैणात करण्यात आला आहे. आन्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत.

या घटनेबाबत बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, हे दुर्दैवी आहे. ज्या भागांमध्ये कधी जातीय तणाव झाले नाहीत तिथे तणाव निर्माण झाला आहे. राजकीय हितासाठी महाराष्ट्राच स्वास्थ खराब करण्याचं काम सुरु आहे. हे निंदणीय आहे. तणाव शांत करण्याचे काम पुढाऱ्यांचे असते मात्र सध्याचे पुढारी जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.