लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना खेळवण्यात येत आहे. भारताचा या सामन्यातील पहिला डाव अवघ्या 224 धावांवर आटोपला. भारतासाठी पहिल्या डावात करुण नायर याने केलेल्या 57 धावांमुळे भारताला 200 धावांच्या पुढे जाता आलं. त्यानंतर इंग्लंडला प्रत्युत्तरात फार काही करता आलं नाही. भारताने इंग्लंडला 247 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे इंग्लंडला 23 धावांचीच आघाडी मिळाली. मात्र नववी विकेट गमावताच इंग्लंडचा डाव आटोपला. 10 वी विकेट पडल्यानंतर डाव आटोपतो. मात्र नवव्या विकेटनंतरच इंग्लंड ऑलआऊट कशी काय झाली? असा प्रश्न काही चाहत्यांना पडला आहे. हे असं का आणि कसं झालं? हे सविस्तर जाणून घेऊयात.
भारताने इंग्लंडला 235 धावांवर आठवा झटका दिला. त्यानंतर हॅरी ब्रूक आणि जोश टंग या जोडीने नवव्या विकेटसाठी 12 धावा जोडल्या. इंग्लंड अशाप्रकारे 247 धावांवर पोहचली. इंग्लंडला 247 धावांवर नववा झटका लागला. हॅरी ब्रूक याच्या रुपात इंग्लंडने नववी विकेट गमावली. त्यानंतर इंग्लंडचा डाव आटोपला. आयसीसीच्या सब्स्टीट्यूट नियमामुळे नवव्या विकेटनंतरच इंग्लंडला ऑलआऊट जाहीर करण्यात आलं.
आयसीसीचा नियम काय?आयसीसीच्या सब्स्टीट्यूट नियमानुसार, कोणताही संघ दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी दुसऱ्याला फिल्डर म्हणून मैदानात घेऊन खेळू शकते. मात्र दुखापत झालेल्या खेळाडूच्या जागी आलेला दुसरा खेळाडू बॅटिंग किंवा बॉलिंग करु शकत नाही. त्यामुळे इंग्लंड टीम नववी विकेट गमावताच ऑलआऊट झाली.
वोक्सला अशी झाली दुखापतओव्हल कसोटीतील पहिल्या दिवशी इंग्लंडचा बॉलिंग ऑलराउंडर ख्रिस वोक्स याला फिल्डिंग करताना भारताच्या डावातील 57 व्या षटकादरम्यान दुखापत झाली. वोक्सला त्यामुळे मैदानाबाहेर जावं लागलं. वोक्स त्यानंतर मैदानात परतू शकला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ख्रिस वोक्स उर्वरित सामन्यातून खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर झाल्याचं जाहीर केलं.
करुणने 57 व्या ओव्हरमधील एका चेंडूवर फटका मारला. वोक्सने पाठलाग करत चेंडू रोखण्यासाठी बाउंड्री लाईनजवळ डाईव्ह मारली. वोक्सला चौकार रोखता तर आला नाही. मात्र या प्रयत्नात त्याच्या खांद्याला दुखापत झाली. वोक्सने हा चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला नसता तर त्याला या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं नसतं.