पाली - रायगड जिल्ह्यात दोन अनोखे व दुर्मिळ साप आढळले आहेत. अलिबागमध्ये शुक्रवारी (ता.1) सायंकाळी 7:45 च्या सुमारास एक दुर्मिळ पिवळ्या पोटाचा समुद्रसर्प आढळला. तर रोहा तालुक्यातील वरसगाव गावामध्ये गुरुवारी (ता. 31) रंगहीन दिवड साप आढळून आला. या दोन्ही सापांना तेथील स्थानिक सर्पमित्रांनी सुरक्षित अधिवासात सोडून जिवदान दिले.
अलिबाग येथे समुद्रकिनारी एका नागरिकास एक समुद्रसर्प वाळूवर पडलेला आढळला, त्यांनी त्वरित वाइल्डलाइफ वॉरियर्स ऑफ अलिबाग संघटनेचे सक्रिय सभासद अक्षय पाटील यांना संपर्क केला, घटनेची माहिती मिळताच संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रसाद दाभोळकर आणि सक्रिय सदस्य अदिती सगर हे त्वरित घटनास्थळी पोहोचले. सापाची प्राथमिक तपासणी करून तो आजारी अथवा जखमी नसल्याची खात्री करून सदर सापाला सुरक्षितपणे पुन्हा समुद्रात सोडून दिले.
तर रोहा तालुक्यात वरसगाव गावामध्ये गुरुवारी (ता. 31) काही व्यक्तींना रंगहीन साप दिसुन आला. त्यांनी लगेचच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेला संपर्क साधला. संस्थेतील सदस्य घटनास्थळी पोहचले. त्यांनी साप पाहिल्यानंतर तो साप हा पान दिवड या जातीचा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परंतु तो साप रंगहीन होता. सापाला सुरक्षित रेस्क्यू करून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
दुर्मिळ समुद्रसर्प
वाइल्डलाइफ वॉरियर्स ऑफ अलिबाग संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रसाद दाभोळकर यांनी सांगितले की हा साप पिवळ्या पोटाचा समुद्रसर्प ( yellow bellied sea snake) म्हणून ओळखला जातो, हे समुद्रसर्प दुर्मिळ असून क्वचितच अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारी सापडतात.
आजारपण, इजा अथवा थकव्यामुळे हे साप भरती बरोबर समुद्र किनाऱ्यावर येतात. हे साप आपले संपूर्ण आयुष्य समुद्रात घालवतात त्यामुळे या सापांची शरीररचना जमिनीवर सरपटण्यासाठी अनुकूल नसते. आणि त्याचमुळे एकदा का हे वाळूवर अडकले की पुढच्या भरतीपर्यंत ते परत समुद्रात जाऊ शकत नाहीत. आणि बरेचदा या दरम्यान त्यांचा मृत्यू होतो.
सर्वच समुद्रसर्प अत्यंत विषारी असून त्यांचा दंश झाल्यास प्रतिसर्पविष लस उपलब्ध नाही, त्यामुळे असे साप किनाऱ्यावर आढळून आल्यास स्वतः त्यांना हाताळण्याचा प्रयत्न करू नये आणि वनविभाग अथवा वाइल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग संघटनेशी संपर्क साधावा.
- डॉ. प्रसाद दाभोळकर, अध्यक्ष, वाइल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग
वर्णहीनता म्हणजे त्वचेतील मेलॅनिन (काळा रंगद्रव्य) नावाच्या द्रव्याच्या अभावामुळे होणारी एक अनुवांशिक स्थिती, ज्यामुळे मनुष्य किंवा प्राण्यांचे त्वचा, केस आणि डोळ्यांचा रंग फिकट किंवा पांढरा होतो. रंगहीन सापांमध्ये देखील रंगहीन मेलॅनिन (काळा रंगद्रव्य) नावाच्या द्रव्याच्या अभाव असतो. हे साप फार दुर्मिळ व क्वचितच पाहायला मिळतात.
- सागर दहिंबेकर, वन्यजीव रक्षक, कोलाड