Maharashtra Politics Live Update : माजी आयुक्त अनिलकुमार पवार अन् त्यांच्या पत्नीला ईडीकडून समन्स
Sarkarnama August 03, 2025 02:45 PM
Jitendra Awhad Controversy : होय, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल - जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं की, होय, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल. सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही; तर, ते प्राचीन काळापासून आहे. भगवान बुद्धाला छळणारे हे सनातनी दहशतवादीच होते. बौद्ध भिक्खूंना मारणारे तत्कालीन सनातनी दहशतवादीच होते. चार्वाकाला मारणारे सनातनी दहशतवादीच होते. बसवेश्वरांना मारणारे सनातनी दहशतवादीच होते. संत ज्ञानेश्वरांना छळणारे सनातनी दहशतवादीच होते, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

Anil Kumar Pawar: माजी आयुक्त अनिलकुमार पवारांसह त्यांच्या पत्नीला ईडीकडून समन्स

वसई विरार शहर महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवारआणि त्यांच्या पत्नी भारती पवार यांना सोमवारी ईडीच्या मुंबईतील वरळी ऑफिसमध्ये हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. हे समन्स गेल्या आठवड्यात पवार यांच्या शासकीय निवासस्थानासह त्यांच्या संबंधित एकूण 12 ठिकाणी ईडीने टाकलेल्या छाप्यांनंतर बजावण्यात आले आहेत.

Narayan Rane vs Uddhav Thackeray : नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे एवढा पैसा येतो तरी कुठून? त्यांची उत्पन्नाची साधनं काय आहेत? जनतेने हे जाणून घ्यायला हवं, ज्यांच्याकडे कोणताही प्रशासनाचा अनुभव नाही, अशा लोकांनी महाराष्ट्र चालवला होता, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

Gotya Gitte Viral Video : कराड दैवत, मुडेंना टार्गेट करु नका, फरार गोट्या गित्तेचा आव्हाडांना इशारा

वाल्मिक कराडची दोन मुलं आणि गोट्या गित्तेने महादेव मुंडे यांची हत्या केल्याचा आरोप केला जात आहे. हे प्रकरण चर्चेत आल्यापासून गोट्या गित्ते फरार झाला आहे. या प्रकरणी पोलीस गोट्याचा शोध घेत आहेत. मात्र, तो अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. अशातच आता त्याने एक व्हिडिओ पोस्ट करत आमदार जितेंद्र आव्हाडांना धमकी दिली आहे. व्हिडिओत त्याने म्हटलं आहे की, माझे वाल्मिक कराडसोबत संबध असल्याचं बोललं जात आहे. मी त्यांचा कार्यकर्ता आहे. दुसरा माझा काही संबंध नाही. पण आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनावणे हे आरोप करत आहेत. तसेच अंजली दमानिया यांनी देखील आरोप केलेत. कोणच्याही मुलींना उचलून नेतो. वंजारी असूनसुद्धा मला जितेंद्र आव्हाडची लाज वाटते. फुकट आरोप माझ्यावर करु नका. जितेंद्र आव्हाड वंजारी समाजाचे नाहीत. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या आरोपींना फाशी भेटलीच पाहिजे. विनाकारण वाल्किम कराड यांच्या मागे हे जोडलं जात आहे. तुम्हाला फक्त राजकारण करायचं आहे. जितेंद्र आव्हाड तुम्ही धनंजय मुंडेंना टार्गेट करु नका. आमचे दैवत वाल्मिक कराड हे गोरगरीब जनतेची काम करतात. परळीत येऊन कोणालाही विचारा वाल्किम कराड कोण आहे ते. त्यांना सर्वजण दैवत मानत आहेत, असंही गित्ते व्हिडिओत म्हणत आहेत.

माधुरी हत्तीनीसाठी नांदनीकरांची थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

नांदणी जैन मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी नादणीकरांनी आता आपला मोर्चा आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर वळवला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राजकारण विरहित सर्वपक्षीयांचा मोर्चा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकत आहे. यासाठी रविवारी पहाटे पाच वाजता नांदणी येथून हा मोर्चा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला आहे. जवळपास 45 किलोमीटरचा प्रवास करून हा महामोर्चा सायंकाळी साडेचार वाजता कोल्हापुरातील जिल्हाधिकार्यालयावर धडकणार आहे. या पदयात्रेत हजारो नागरिक भल्या पहाटे सहभागी झाले आहेत.

Mahadev Munde Murder Case : महादेव मुंडेंच्या हत्येचा तपास करण्यासाठी SIT चे प्रमुख आज बीडमध्ये दाखल होणार

महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. याच प्रकरणाचा तपासासाठी पंकज कुमावत आज बीडमध्ये दाखल होणार असल्याची माहिती आहे.

Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट यांचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य

अकोला शहरातील निमवाडी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन वास्तूचे लोकार्पण सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झाले. यावेळी भाषणात बोलताना ते म्हणाले, आपल्या भागातील वसतिगृहासाठी निधीची मागणी करा. वसतिगृहाला पाच, दहा, पंधरा कोटींचा निधी लागत असेल तरी तो मागा. नाही दिला तर नाव सांगणार नाही. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातायं?, असं वक्तव्य त्यांनी केल्याने आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

MNS : मनसेकडून पनवेलमध्ये लेडीज बारची तोडफोड

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पनवेलमधील लेडीज बारचा उल्लेख केला होता. शिवरायांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यात डान्स बार असून यामुळे तिथली तरूण पीढी बरबाद होत असल्याचंही त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं. राज यांनी पनवेलमधील डान्स बारवर टीका केल्यानंतर स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी पनवेलमधील नाईट राईड डान्स बारची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.