Mahadevi Elephant Protest : एक दिवस 'महादेवी'साठी, नांदणीतून मूक मोर्चा निघाला, कसा असेल रूट; जाणून घ्या वेळापत्रक
esakal August 03, 2025 02:45 PM

Nandani Math Elephant : ‘महादेवी हत्तीण’ परत मिळविण्यासाठी रविवारी (ता.३) पहाटे पाच वाजता नांदणी येथून पदयात्रेला सुरुवात झाली. माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह अन्य पक्षाचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित आहेत. दिवसभरात ४५ किलोमीटर चालत ही पदयात्रा कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. यात हजारो सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले आहेत.ही मूक मोर्चा अत्यंत शांततेत आणि शिस्तप्रिय होणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. नांदणी निशिधीका येथे श्री चक्रेश्वरी देवीची आरती झाल्यानंतर पदयात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर निशिधीका-माणगांवेकोडीहून कोल्हापूर-सांगली महार्गावर पदयात्रा आली.

असे असेल वेळापत्रक :

सकाळी ५ वाजता – सुरुवात: निषिधिका, नांदणी

सकाळी ७ वाजता – निमशिरगाव फाटा (चहा)

सकाळी ७:३० वाजता – तमदलगे (नाश्ता)

सकाळी १० वाजता – रामलिंग फाटा (चहा-नाश्ता)

दुपारी १:३० वाजता – विशाल मंडप कार्यालय, चौकाक (जेवण)

दुपारी ४:३० वाजता – तावडे हॉटेल (चहा-पाणी)

सायंकाळी ५:३० वाजता – जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर (निवेदन देणे)

ही पदयात्रा जनतेच्या सहभागातून, माधुरी हत्तीच्या संरक्षणासाठी व न्यायासाठी आयोजित केली आहे.

राजू शेट्टी काय म्हणाले...

"गुजरातमधल्या जामनगरमधील वनतारामध्ये नांदणी मठातील महादेवी/माधुरी हत्तीणीला बेकायदेशिर नेण्यात आलं. खोटं रेकॉर्ड तयार माधुरीला वनताराच्या स्वाधीन करण्यात आलं. कोल्हापूरच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी माधुरी प्रवासाला फिट आहे अशा प्रकारचे सर्टिफिकेट देण्यात आलं. जंगली प्राणी रात्री प्रवास करत नसतात तरीसुद्धा रात्री बारानंतर तिथून पुढे सलग 48 तास प्रवास करून माधुरीला वनतारामध्ये नेण्यात आले."

Elephant Vantara Letter : मी, मी म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधींचा पुढाकार ठरला बिनकामाचा..., वनताराने प्रसिद्ध केलं पत्र; म्हणाले...

"दरम्यान, सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निर्णय आहे तो अंतिम नसून कोर्टाचा निर्णय बदलण्याचा अधिकार देशाच्या राष्ट्रपतींना आहे. फाशीची शिक्षा झालेले अनेक कैदी दयेचा अर्ज करतात तसाच आम्ही आमच्या माधुरीला लिहिता वाचता बोलता येत नाही पण तिनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत चार तास नांदणीमध्ये मिरवणूक चालू असताना तिने पाण्याचा थेंब घेतला नाही, फळ घेतले नाहीत, एवढेच नव्हे तर रडत रडत ती गेली माधुरीला नांदणी मठ सोडायचा नव्हता ते यातून स्पष्ट होत आहे."

"माधुरीच्यावतीने आम्ही सारे जण महामहीम राष्ट्रपतींना दयेचा अर्जदेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा घेऊन निघालो आहोत हा मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाला गेल्यानंतर आमच्याबरोबर असणाऱ्या १० भगिनी माधुरीच्यावतीने राष्ट्रपतींना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दयेचा अर्ज सादर करतील आणि मग राष्ट्रपतींनी यावर निर्णय घ्यायचा आहे."

"या मोर्चा मूक मोर्चाचे नेतृत्व कोणीही करत नाही इतर कुठलाही झेंडा नाही, कुठलाही पक्ष नाही, संघटना नाही, जात नाही, धर्म नाही, हे केवळ तथाकथीत पेटा या प्राणी संस्थेने माधुरीवर अन्याय केला. या देशातल्या उद्योगपतींना आमच्यावर कसा अन्याय केला, ही कैफियत राष्ट्रपतींच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही हजारोंची जनता मूक मोर्चा घेऊन निघालेली आहे. असे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले."

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.