अश्विनी देव- editor@esakal.com
मराठीत रहस्यकथा, गूढकथा आणि थरारकथा आपली लोकप्रियता टिकवून आहेत, अनेक जण त्या प्रांतांत मुशाफिरी करत आहेत. नवे नवे लेखक वेगवेगळे विषय हाताळत आहेत. मात्र त्यातही बऱ्याच वेळा विदेशी कथांचा अनुवाद करण्याचे प्रमाण बरेच आहे. या पार्श्वभूमीवर इथल्या वातावरणातल्या आणि मोठा आवाका असलेल्या पुस्तकाचे दर्शन झाले, तो कथासंग्रह म्हणजे सरिता आठवले यांचा ‘विळखा’ हा कथासंग्रह. ही लेखिका मोठा पल्ला गाठेल याची खात्री पटावी अशा यातल्या कथा आहेत.
सरिता आठवले या ज्येष्ठ कवी शांताराम आठवले यांच्या सून. या कथासंग्रहातल्या चारही कथा वाचकाला वेगळ्याच विश्वात नेतात. या चारही कथा दीर्घ स्वरूपाच्या आहेत. यातली पहिलीच कथा ‘विळखा’ ही अभिजित आणि सायली तसेच डॉ. रघुनाथ नेने या तिघांच्या भोवती फिरणारी. कथेत वरकरणी दिसायला ही तीन पात्रे. पण त्यांच्याबरोबरीने येणारी आणखी भरपूर पात्रे यामुळे ही दीर्घ कथा वेगवेगळी वळण घेते.
पुस्तकात आपल्या मनोगतामध्ये आठवले यांनी आपल्याला स्क्रीन-प्ले म्हणजे काय याची ओळख झाल्याचे म्हटले आहे. इथे त्यांनी खरोखर एखाद्या रहस्यमयी चित्रपटाची वेगवान पटकथा असावी असे कथानक रचले आहे. एखाद्या हॉलिवूड पटाला लाजवेल असे एकमेकात गुंफलेले कथेचे धागे, वाचकांची उत्कंठा ताणून तर धरतातच पण कथालेखिकेचे कथानकावर प्रभुत्व असे आहे, की कथानकातला खलनायक कोण हे कथानकाच्या मध्यंतरात उलगडले जाते पण तोच कसा खलनायक आहे, हे सिद्ध करणारा उर्वरित कथाभाग वाचलाच पाहिजे याची वाचकाला इच्छा होते. त्याचे कथानकातील स्वारस्य संपत नाही.
मनोवैज्ञानिक पातळीवर ही कथा नेऊनही त्यात कुठलीही क्लिष्टता न आणता व्यक्तिरेखांची गुंतागुंत वाचकांपर्यंत त्या पोहोचवतात. वाचक त्यांच्या कथानकाबरोबर खलनायक शोधायच्या कामात गर्क होतो. काही वेळा त्रुटी जाणवूनही त्याचा त्याला विसर पडतो पण या तिघांच्या नाट्यात तो सकारात्मकतेच्या म्हणजेच कथानकाच्या प्रवाहातला खलनायक कोण, याच्या उत्तराची वाट पाहतो, कथा संपल्यावर त्यातल्या भरडल्या गेलेल्या पात्राच्या दुःखाबद्दल त्याला नकळत करुण वाटू लागते. त्याचबरोबर नायक-नायिका जिंकले, या आनंदाबरोबर हुश्श झाल्याचीही भावना वाचकाच्या मनात जागी होईल. कारण कथानकाचा वरखाली होणारा वेगवान प्रवास त्याला भोवंडून टाकणारा आहे. लेखिकेने इथे मानवी स्वभावाचा बारकाईने अभ्यास करून सगळे कथानक फुलवले आहे. यात नायिकेचा अल्लडपणा, वेळप्रसंगी येणारा प्रगल्भपणा, तसेच दोन प्रेमीजीवांची तगमग असे सगळे छान पद्धतीने गुंफले आहे.
यातल्य अन्य तीन कथा अशाच वेगळ्या वाटेच्या आणि मानवी मनाला भावणाऱ्या, त्याचबरोबर बुद्धीला थक्क करणाऱ्या व्यक्तिरेखांचा वावर यामुळे लक्षात राहतात. ‘रस्ता थिजला’ आणि ‘देसाई ॲन्ड देसाई’ या कथा वाचकांच्या मनाचा ठाव घेतात. यातली ‘पाश’ ही कथा तर माणसं अशीही असतात या शक्यतेने प्रज्ञा या पात्राचा प्रचंड दुःस्वास करायला लागतील तर अनघा आणि माधव या दोन व्यक्तिरेखांवर प्रचंड प्रेम करायला लागतील. ‘पाश’ मधल्या माधवच्या जीवनातली अवस्था त्याच्याबद्दल ममत्व तर वाटू देतेच पण त्याच्यावर येणाऱ्या संकटांमुळे वाचकांचे डोळे ओलावले नाहीत तर नवल.
Premium| Do Bigha Zamin: बिमल रॉय यांच्या 'दो बीघा जमीन' सिनेमाने हा इतिहास रचला होता...कुठल्याही कथेत माणसाची सकारात्मकता कशी वरचढ ठरेल याची काळजी लेखिका घेते मात्र त्याचबरोबर खलत्वाचा प्रभावही दिसेल, याकडे लेखिका नेमकेपणाने लक्ष देते. मात्र हे खलत्व यातल्या सर्व कथांमध्ये सज्जन व्यक्तींइतक्याच ताकदीचे अर्थातच बुद्धिमान आणि तेवढेच मानसिक पातळीवर खंबीरपणे लढणारे आहे. त्यामुळेच यातला संघर्ष अधिक थेटपणे आणि धारदार तर होतोच पण वाचकालाही भिडतो. एखाद्या बुद्धिबळाच्या डावाप्रमाणे एकमेकांवर वेगवेगळ्या डावपेचांद्वारे कुरघोड्या करत कथानक पुढे सरकत जाते. काही वेळा वाचकाला वेगळाच भास होतो, एकप्रकारे चकवाच निर्माण होतो. पण हा चकवाच वाचकाची बौद्धिक मनोरंजनाची भूक शांत करतो. ओघवती भाषा, प्रवाही कथानक आणि व्यक्तिरेखांची ठसठशीत मांडणी यामुळे चारच कथा पण खूप मोठ्या जगाचा फेरफटका करून आल्याचा अनुभव देतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारतीय मातीतल्या या कथा त्यातल्या विषयाची निवड आणि आवाका यामुळे वाचकाला चकित करतात.