नारायणगाव, ता. २: वाहतूक नियमांचे उल्लंघन करून काही फळ,भाजीपाला, टोमॅटोची वाहतूक करणारे पिकअप चालक मद्यपान करून वाहने चालवतात. भरधाव वेगाने नागमोडी वाहन चालवून, नागीन डान्स करून मोबाईलवर रिल्स बनवतात. यामुळे नारायणगाव -जुन्नर रस्त्यावर पिकअपची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यातील रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यापुढे वाहतूक नियमांचे पालन न केल्यास चालक व मालक यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिला आहे.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नारायणगाव, ओतूर, आळेफाटा, जुन्नर, बेल्हे येथे उपबाजार आहेत. फळ, भाजीपाला, टोमॅटो व जनावरांची वाहतूक पिकअप जीप, टेम्पो मधून केली जाते. दररोज सुमारे दोन हजार वाहने जुन्नर तालुक्यातून ये जा करतात. प्रामुख्याने पुणे, मुंबई सह इतर राज्यात फळ भाजीपाल्याची वाहतूक करतात. तसेच बीड, पारनेर, शिरूर, बारामती, अकोले भागातील शेतकरी प्रामुख्याने कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मेथी विक्रीसाठी नारायणगाव, आळेफाटा उपबाजारात घेऊन येतात. वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने पुणे -नाशिक, कल्याण-नगर, अष्टविनायक महामार्ग व इतर जिल्हा मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीची समस्या सुद्धा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नारायणगाव उपबाजारात नारायणगाव पोलिस ठाण्याच्या वतीने वाहन चालक, मालक, व्यापारी व बाजार समितीचे संचालक यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक शेलार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक निवृत्ती काळे, सारंग घोलप, सचिव रूपेश कवडे, उपसचिव शरद घोंगडे, हवालदार दत्तात्रेय ठोंबरे यांच्यासह वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
06985