नाशिक: वैद्यकीय शाखेतील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सुरू असलेल्या प्रक्रियेत नोंदणीला मुदतवाढ मिळाली आहे. आयुष अभ्यासक्रमांच्या प्रवेशासंदर्भात केलेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असून, सोमवार (ता. ४)पर्यंत पात्रताधारक विद्यार्थ्यांना नोंदणी करून प्रक्रियेत सहभागी होता येईल.
इयत्ता बारावीनंतर पदवी स्तरावरील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ‘नीट’ परीक्षा घेतली होती. यानंतर राज्यस्तरावरील उपलब्ध जागांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलतर्फे प्रक्रिया राबविली जात आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या मुदतीनुसार प्रवेशप्रक्रियेत सहभागासाठी आवश्यक असलेल्या नोंदणीसाठी गुरुवार (ता. ३१)पर्यंत मुदत दिली होती. मात्र, यादरम्यान शासनाने वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पात्रतेशी निगडित अटीत बदल जाहीर केले होते.
आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावीच्या लेखी परीक्षेत किमान गुणांची अट रद्द करताना केवळ बारावी उत्तीर्णची पात्रता ठेवली आहे. या बदलानंतर पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना नोंदणीची संधी मिळावी, तसेच आतापर्यंत नोंदणी करू न शकलेल्या इतर पात्रताधारक विद्यार्थ्यांना नोंदणी करता यावी, यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘एमबीबीएस’ची यादी ११ ला
नोंदणीस मुदतवाढ दिल्याने एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेश वेळापत्रकात बदल झाला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांसाठी प्राधान्यक्रम नोंदणीसाठी ६ ते ९ ऑगस्टदरम्यान मुदत दिली जाईल; तर या अभ्यासक्रमांसाठी पहिल्या फेरीची निवड यादी ११ ऑगस्टला प्रसिद्ध केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १२ ते १७ ऑगस्टदरम्यान मुदत असेल.
Pankaja Munde : नद्यांच्या प्रदूषणावर ठोस उपाययोजना; पंकजा मुंडेंचा दीर्घकालीन आराखडा तयारअसे आहे सुधारित वेळापत्रक...
सुधारित प्रवेश वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी सोमवार (ता. ४)पर्यंत मुदत असेल. निर्धारित शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी मंगळवार (ता. ५)पर्यंत मुदत दिलेली आहे. याच मुदतीपर्यंत नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी त्यांची कागदपत्रे अपलोड करायची आहेत. पुढील टप्प्यात बुधवारी (ता. ६) नोंदणीकृत विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल.