पुणे : खराब रस्त्यावरून दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ज्येष्ठ नागरिकाला आपल्या प्राणाला मुकावे लागले. रस्त्यांवरील खड्ड्यांसह पदपथ व रस्त्यांमधील भेगांवरून दुचाकी घसरल्यामुळे संबंधित अपघात घडल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. आता जाग आलेल्या महापालिकेने रस्त्यांमधील भेगा दुरुस्तीच्या कामाला वेग देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
जगन्नाथ काशिनाथ काळे (वय ६१, रा. पिनाक गंगोत्री सोसायटी, औंध) हे बुधवारी औंधमधील नागरस रस्त्याने त्यांच्या दुचाकीवरून जात होते. त्या वेळी रस्ता व पदपथामधील भेगांवरून त्यांची दुचाकी घसरून ते रस्त्यावर पडले. त्या वेळी पाठीमागून येणाऱ्या चारचाकी वाहनाच्या चाकाखाली आले. अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत महापालिकेच्या पथ विभागाकडून होणारे दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे नागरिकांचा जीव जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. त्याबाबत महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, ‘‘दुचाकी घसरून अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. रस्त्यांवरील खड्डे, मध्यभागी पडणाऱ्या फटी दुरुस्तीची कामे सुरू आहेत. मात्र ही कामे अधिक गतीने करण्यास प्राधान्य दिले जाईल.’’
औंधमधील कोणत्याही रस्त्यावरून आले तरीही वाहतूक कोंडी कायम असते. रस्ते मोठ्या प्रमाणात खराब आहेत. खराब रस्ते व अवजड वाहनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे.
- केशव साटम, नागरिक