Solapur Politics News : राज्याच्या राजकारणात एकावर एक स्फोटक घटना घडत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे पक्षबदलाचे वारे चांगलेच घोंघावते आहेत. स्थानिक नेतेमंडळी आपल्या सोईसाठी पक्षबदल करताना दिसत आहेत. नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आणि विश्वासू मानले जाणारे सोलापुरातील नेते शिवाजी सावंत यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला सोडचिट्ठी दिली. त्यानंतर आता याच जिल्ह्यातून आणखी एक मोठी माहिती समोर येत आहे. या घडामोडीमुळे सोलापुरात शिंदे गटाला आणखी मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख असलेले शिंदे गटाचे नेते शिवाजी सावंत यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या या निर्णयानंतर आता जिल्ह्यातील एकूण 11 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये जिल्हा समन्वयक, उपजिल्हा प्रमुख यांच्यासह वेगवेगळ्या तालुक्यांच्या प्रमुखांचा समावेश आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत सर्वच नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील भूमिका ठरवली जाणार आहे.
पक्षातील काही लोक अधिकार नसताना पदाधिकारी निवडी करत आहेत. संपर्कप्रमुख असलेले शिवाजी सावंत यांच्या तालुक्यातील निवडी लोकसभा संपर्कप्रमुख असलेल्या व्यक्ती करत आहेत. याबाबत आम्ही पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांना सांगूनही काही बदल झाला नाही. त्यामुळे आज आम्ही आमच्या पदाचे सामूहिक राजीनामे दिले आहेत, अशी भूमिका यावेळी शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक दिलीप कोल्हे आणि उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ चौगुले यांनी मांडली आहे.
दरम्यान, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार असल्याने सर्वच स्थानिक पदाधिकारी पक्षासाठी फार महत्त्वाचे आहेत. कारण या निवडणुका स्थानिक पातळीवर लढवल्या जाणार असल्याने यावेळी तालुका पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका फार महत्त्वाची असते. असे असताना शिंदे गटाला सोलापुरात मोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे आता शिंदे यातून मार्ग कसा काढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.