हडपसर : हुंडा म्हणजे प्रत्येक मुलीच्या सुगंधित आयुष्यावर पडलेलं विरजणचं. त्यातून उध्वस्त होणाऱ्या हळव्या भाव-भावना आणि निर्माण होणारा मानसिक संघर्ष कायमची टोचणी लावणारा ठरतो. याच दुःखाला वाचा फोडण्यासाठी कु. पूर्वा लक्ष्मीकांत हडवळे हिने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी 'कस्तुरी' ही कादंबरी लिहून हुंडा प्रथेवर जोरदार आघात केला आहे.
पूर्वाने साकारलेल्या या कादंबरीचे प्रकाशन नुकतेच 'पियुची वही' या कादंबरीकरिता मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी बालसाहित्यिक पुरस्कार प्राप्त लेखिका डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते झाले. येथील कुमार पिकासो हॉलमध्ये हा कादंबरी प्रकाशनाचा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती राजमानी होत्या.
डॉ. संगीता बर्वे म्हणाल्या, "आपला भोवताल आणि समाजमनाचा ठाव घेणारा प्रतिभावंत निश्चितपणे दर्जेदार साहित्यकृती देत असतो. पूर्वाने कस्तुरीतून अशाच प्रकारे समाजातील हुंडा प्रथेचे विदारक वास्तव मांडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. आपल्यातील लेखन कौशल्य तीने टिकवून ठेवल्यास या क्षेत्रातील तीचे भवितव्य उज्वल असेल. तीचे वाचन, शब्दफेक व एकूणच कादंबरी लेखनातील तारतम्य वाखाणण्याजोगे आहे. तीने यापुढेही आपल्या लेखनातून अशा सामाजिक विषयांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा.'
पूर्वा सध्या आयर्वेद महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत आहे. कोरोना काळात दहावीत असताना तीने आपल्या कस्तुरी कादंबरीचे लेखन केले. सुमारे आठ ते नऊ महिन्यात तीने २१६ पानांची ही कादंबरी लिहिली. कस्तुरी या तीच्या दुर्दैवी नायिकेच्या व्यथांच्या माध्यमातून हुंडा प्रथेवर तीने प्रहार केला आहे. पूर्वाला काव्य, गद्य लेखन, वक्तृत्वामध्ये विशेष रुची आहे. वक्तृत्वामध्ये तिला राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळालेला आहे.
"मला लहानपणापासूनच वाचन लेखनाची मोठी आवड आहे. दहावीतील एका पाठांमध्ये हुंडाबळीचा विषय अभ्यासण्यात आला. वृत्तपत्र आणि दूरचित्रवाहिनीवरही त्याबाबत अनेक वेळा बातम्या आलेल्या पाहिल्या. त्यातूनच माझ्या "कस्तुरी' चा जन्म झाला. काही तांत्रिक अडचणीमुळे प्रकाशन पाच वर्षे लांबले. चेतक प्रकाशनच्या माध्यमातून ही कादंबरी आपल्यासमोर आणताना आनंद होत आहे. यामधून एक जरी हुंडाबळी रोखला गेला तरी मी या कादंबरीचे यश समजेल.'
कु. पूर्वा हडवळे, लेखिका
पूर्वाच्या आई श्रीमती कविता हडवळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कुणाल ताजणे यांनी सूत्रसंचालन तर ज्ञानेश्वर हडवळे यांनी आभार मानले.