Pankaja Munde : राज्यात सध्या महायुतीचे सरकार असले तरी सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांत वेगवेगळ्या कारणांमुळे संघर्ष पाहायला मिळालेला आहे. मंत्र्यांचा एकमेकांच्या खात्यांतील हस्तक्षेप आणि खात्यांना मिळणारा निधी अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून या तिन्ही पक्षांतील अनेक नेत्यांनी आतापर्यंत नाराजी व्यक्त केलेली आहे. दरम्यान, आता पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनीदेखील माझ्या खात्याकडे बजेट नाही अशा शब्दांत आपली खदखद व्यक्त केली आहे. तसेच शासनाने आम्हाला थोडी मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केलीय.
पंकजा मुंडे नाशिक दौऱ्यावर होत्या. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी माझ्या खात्याकडे निधी नाही, अशी खंत व्यक्त केली. पंकजा मुंडे सध्या पर्यावरण, हवामान बदल आणि पशुसंवर्धनमंत्री आहेत. नाशिकमधील कार्यक्रमात पंकजा त्यांच्याकडे असलेल्या खात्यांविषयी बोलत होत्या. याच वेळी बोलत असताना शासनाने आम्हाला थोडी मदत करावी. माझ्या खात्याकडे बजेट नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
सध्या मी पर्यावरणमंत्री आहे. सध्या प्रदूषण करणारे उद्योग उभे राहिले आहेत. आपण कचऱ्याची सामूहिक जबाबदारी घेतली पाहिजे. आता लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे. वातावरणीय बदल हे खातेसुद्धा माझ्याकडेच आहे. सध्या वातावरण बेभरोशाचे झाले आहे. राज्यात अनेक साखर कारखाने आहेत. टायर जाळून ऑइल बनविणाऱ्या कंपन्या आहेत. खाणी आणि वाळूबाबतही आम्हाला लक्ष द्यावे लागणार, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
तसेच पर्यावरण हे खाते MPCB पर्यंतच मर्यादित नाही. आमची उद्योगांच्या विरोधात भूमिका नाही. उद्योगांना शक्ती देऊन आम्ही पर्यावरणाचे काम करू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. आपण जेवढे पाणी वापरतो त्यातील, 48 टक्के पाणी तसेच नदीत जाते. काही नद्यांचे पाणी म्हणजे गटाराच्या पाण्यासारखे झाले आहे. नमामी गंगेचा मी आढावा घेतला त्यात प्रगती दिसली नाही, असे म्हणत त्यांनी नियम आणि कायदा आहे त्याचे पालन झाले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
पुढे बोलताना पंकजा मुंडे यांनी त्यांच्याकडे असलेल्या खात्याबद्दल आणि त्या खात्याला मिळणाऱ्या निधीबाबत आपल्या भावाना व्यक्त केल्या. आम्ही सिईटीपी प्लांट आम्ही उभारू, पण शासनाने आम्हाला थोडी मदत करावी. माझं काम पोलिसासारखे शिट्टी वाजवण्याचे आहे. माझ्या खात्याकडे बजेट नाही. माझ्या खात्याला बजेट म्हणजे उद्योग विभागाच्या चुका. त्यांना फाईन दिल्यावर आम्हाला बजेट मिळते, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
पुढे बोलताना त्यांनी नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावरही भाष्य केले. यावेळच्या कुंभमेळ्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री, कुंभ मंत्री आणि मुख्यमंत्री लक्ष घालतील. पण पाण्यात डुबकी मारताना ते कसे शुद्ध राहील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.