वृंदावन येथील प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील एका तरुणाने फेसबुकवर ही धमकी दिली आहे. या घटनेनंतर सतना आणि रीवा येथील भक्तांनी तसेच अनेक सामाजिक संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. संत समाजातही याबाबत प्रचंड संताप पसरला आहे.
कोणी दिली धमकी?
सतना जिल्ह्यातील शत्रुघ्न सिंह नावाच्या तरुणाने संत प्रेमानंद महाराज यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीमुळे सतना आणि रीवा जिल्ह्यांतील भक्तांचा संताप अनावर झाला आहे. अनेक सामाजिक संघटनांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. शत्रुघ्न सिंह याने स्वत:ला आपल्या फेसबुक प्रोफाइलवर पत्रकार असल्याचे म्हटले आहे.
वाचा: सोलापूरमधील नामांकित शाळेत धक्कादायक प्रकार! शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
संत समाजाचा संताप
प्रेमानंद महाराजांना मिळालेल्या धमकीमुळे संत समाजात तीव्र संताप पसरला आहे. श्री कृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासचे अध्यक्ष दिनेश फलाहारी बाबा यांनी सांगितले की, “कोणीही प्रेमानंद बाबांकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास आम्ही ते सहन करणार नाही. आम्ही कोणत्याही गुन्हेगाराच्या गोळीला छातीवर झेलण्यास तयार आहोत.” त्यांनी पुढे म्हटले की, “ही पवित्रभूमी आहे, जिथे अत्याचार करणाऱ्या कंसासारख्या राजाचाही वध झाला. कोणताही गुन्हेगार प्रेमानंद महाराजांना स्पर्श करू शकत नाही.”
कठोर कारवाईची मागणी
फलाहारी बाबांनी सरकारकडे या तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महंत रामदास महाराज यांनीही म्हटले की, “गाय, कन्या आणि साधू यांचे रक्षण अत्यंत आवश्यक आहे. जो कोणी प्रेमानंद महाराजांविरुद्ध अशी टिप्पणी करेल, त्याला संत समाज माफ करणार नाही.” दरम्यान, पोलिसांनी अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार प्राप्त झाली नसल्याचे सांगितले आहे. मात्र, तक्रार मिळताच कारवाई केली जाईल, असे सतनाचे एसपी आशुतोष गुप्ता यांनी स्पष्ट केले. ते या प्रकरणावर लक्ष ठेवून असून कायदेशीर कारवाई करतील, असेही त्यांनी नमूद केले.
सोशल मीडियावर धमकीचा तपशील
गुरुवारी सतना येथील शत्रुघ्न सिंह याने फेसबुक पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, “हा संपूर्ण समाजाचा प्रश्न आहे! जर माझ्या घराचा विषय असता, तर प्रेमानंद असो वा कोणीही, मी त्याचा गळा कापला असता.” ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यामुळे या प्रकरणाने तीव्र स्वरूप धारण केले.
प्रेमानंद महाराजांनी व्हिडीओत काय सांगितले?
नुकताच प्रेमानंद महाराजांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत होता. या व्हिडीओत त्यांनी तरुणांना सल्ला दिला होता की, त्यांनी मनमानी आणि चुकीच्या वर्तनापासून दूर राहावे. त्यांनी म्हटले होते की, “आजकाल समाजात बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड, ब्रेकअप आणि पॅचअप यांचे चलन वाढले आहे, जे तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे.” या व्हिडीओच्या संदर्भातच शत्रुघ्न सिंह याने संतांना धमकी दिल्याचे समोर आले आहे.