सध्याच्या आधुनिक युगात अनेक जोडपी डेटवर जातात. एकमेकांसोबत आनंदाचे क्षण घालवतात. मात्र आता अमेरिकेतील फिनिक्स शहरात एका तरुणाला जॅकलिन नावाच्या महिलेसोबत डेटवर जाणं भोवलं आहे. हे दोघे एका डेटिंग साइटवर एकमेकांना भेटले होते. त्यानंतर ते डेटवर गेले. त्यानंतर सुमारे 10 महिन्यांत जॅकलिनने त्या पुरूषाला 1,59,000 पेक्षा जास्त मेसेज पाठवले असल्याचे समोर आले आहे. यामुळे या तरुणाला त्रासाचा सामना करावा लागला आहे.
जॅकलीनने संबंधित तरुणाला त्रास दिल्याचा आरोप आहे. समोर आलेल्या माहितीनुसार जुलै 2017 मध्ये जॅकलिन त्या तरुणाच्या घराबाहेर उभी होती, त्यावेळी तरुणाने पोलिसांना फोन केला. त्यानंतर पोलिसांनी तिला तेथून दूर हटवले. मात्र त्यानंतर जॅकलिनने त्याला धमकीचे मेसेज पाठवण्यास सुरुवात केली.
एका मेसेजमध्ये जॅकलिनने तरुणाला धमकी देताना लिहिले की, “मी तुझ्या किडनीची सुशी बनवेन आणि तुझ्या हाडांची चॉपस्टिक्स बनवेन.” यामुळे तरुण घाबरला. पोलिसांनी जॅकलिनला विचारले की, तू पाठवलेले मेसेज सामान्य आहेत का? यावर तिने “नाही, मी जे बोलते ते सामान्य आहे असं मला वाटत नाही. याबाबत आता मला जाणीव झाली. तिने पुढे बोलताना म्हटले की, जर तो माझ्यासोबत राहू इच्छित नसेल तर ते ठीक आहे, पण तो खूप गोड आहे. मला विश्वास बसत नाही की माझ्यामुळे तो घाबरला आहे.”
एप्रिल 2018 मध्ये जॅकलिनला पुरूषाच्या घरात घुसल्याबद्दल अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे यावेळी तो व्यक्ती परदेशात होता. पोलिसांना ती त्याच्या घरात आंघोळ करताना आढळून आली. या अटकेनंतर तिने पोलिसांना सांगितले की, मी माझ्या मनात एक कथा रचली होती, ज्यात मी त्याच्या घरात राहते, त्यामुळे मी इथे आले होते.’
तपासणीवेळी पोलिसांना तिच्या गाडीत एक मोठा चाकू सापडला होता. तसेच हा पुरूष ज्या ठिकाणी काम करत होता, तिथेही जॅकलिन गेली होता, तिथे तिने आपली ओळख त्या पुरूषाची पत्नी म्हणून करून दिली होती. तसेच तिच्यावर त्या पुरूषाचा पाठलाग केल्याचा आणि त्याच्या घरात घुसल्याचा आरोप आहे. मात्र तिने यात आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे.