अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना लंडनच्या ओव्हल मैदानात होत आहे. मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियाला हा सामना काहीही करून जिंकणं भाग आहे. तिसऱ्या दिवशीच दुसऱ्या डावाचा खेळ सुरु झाला आहे. इंग्लंडनं घेतलेली आघाडी मोडून भारताने 150 पार धावा केल्या आहेत. 250 पार धावा केल्या तर भारतीय संघाकडून अपेक्षा करू शकतो. त्यामुळे फलंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, यशस्वी जयस्वाल आणि आकाश दीप यांनी चांगली फलंदाजी केली. आकाश दीप 66 धावा करून बाद झाला. तर शुबमन गिल काही खास करू शकला नाही. त्यामुळे टीम इंडियाचं मनोबल वाढवण्यासाठी रोहित शर्माने मैदानात हजेरी लावली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहित शर्माने ही मालिका सुरु होण्यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर विराट कोहलीने कसोटीला रामराम ठोकला. त्यामुळे संघाचं नेतृत्व युवा क्रिकेटपटू शुबमन गिलकडे सोपवण्यात आलं.
टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात रोहित शर्मा इतर चाहत्यांप्रमाणे आपलं तिकीट दाखवून मैदानात प्रवेश करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. रोहित शर्माला मैदानात पाहून भारतीय क्रीडाप्रेमी खूश झाले. रोहित शर्मा मागच्या काही आठवड्यांपासून युरोप देशात सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. मागच्या काही दिवसांपासून इंग्लंडमध्ये आहे. पण इतक्या दिवसानंतर पहिल्यांदाच सामना पाहण्यासाठी मैदानात आला आहे.
रोहित शर्माच्या उपस्थितीमुळे टीम इंडियाच्या चाहत्यांना विजयाच्या आशा उंचावल्या आहे. कारणही तसंच आहे.. कारण रोहित शर्मासाठी हे मैदान खूप लकी आहे. टीम इंडियाने मागच्या वेळी इंग्लंड दौरा केला होता. तेव्हा रोहित शर्माने या मैदानात दमदार खेळी केली होती. त्याने 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध याच मैदान दुसऱ्या डावात शतक ठोकलं होतं. त्या खेळीड्या जोरावर टीम इंडियाने मालिकेत आघाडी घेतली होती. या मैदानावर टीम इंडियाने 50 वर्षानंतर पहिला विजय मिळवला होता.