येत्या काही वर्षांत मानवी मृत्यू ही भूतकाळातील गोष्ट होईल का? माजी गुगल अभियंता आणि प्रसिद्ध भविष्यवेत्ता रे कुर्झवेल यांनी असा दावा केला आहे. त्यांनी अलीकडेच म्हटलं आहे की 2030 सालापर्यंतच , म्हणजे आजपासून फक्त 5 वर्षांच्या आत, मानव अमर होऊ शकतो. ही साधी गोष्ट नाही, कारण कुर्झवेल यांनी आतापर्यंत 147 भाकिते केली आहेत, त्यापैकी 86 टक्क्यांपेक्षा जास्त भाकितं बरोबर असल्याचे सिद्ध झाले आहे.
कुठून सुरू झाला हा दावा ?
रे कुर्झवेल यांच्या प्रसिद्ध पुस्तक The Singularity is Near मध्ये त्यांनी पहिल्यांदाच लिहिलं की येत्या काळात तंत्रज्ञान इतके विकसित होईल की मानव कधीही न मरणारी प्रजाती बनू शकेल. या पुस्तकात त्यांनी विशेषतः जेनेटिक्स (Genetics), नॅनोटेक्नॉलॉजी (Nanotechnology) आणि रोबोटिक्सचा (Robotics) उल्लेख केला आहे – ज्यांना ते अमरत्वाची गुरुकिल्ली मानतात.
टेक्नॉलॉजी कसे देईल अमरत्व ?
कुर्झवेल यांच्या मते, तांत्रिक विकासाचा वेग इतका वेगवान झाला आहे की आपण लवकरच नॅनोबॉट्स, म्हणजेच सूक्ष्म रोबोट्स तयार करू शकू, जे मानवी शरीरात राहून काम करतील. हे नॅनोबॉट्स :
– शरीरातील खराब झालेल्या पेशी दुरुस्त करेल.
– वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावेल
– रोगांशी लढेल, अगदी कर्करोगासारख्या गंभीर आजारांशीही लढतील.
हे छोटे रोबोट शरीरात तरंगतील आणि सतत त्याची दुरुस्ती करत राहतील. त्यामुळे अशा प्रकारे आपलं शरीर म्हातारं होणार नाही आणि माणूस कायमचा जगू शकेल.
AI आणि कॉम्प्युटरचीही असेल मुख्य भूमिका
कुर्झवेल यांचा असा विश्वास आहे की 2029 सालापर्यंत कॉम्प्युटर हे मानवांइतकेच बुद्धिमान होतील. असे स्मार्ट कॉम्प्युटर मानवी मेंदू चांगले समजू शकतील, तसेच कॉपी करू शकतील आणि विचारही करू शकतील. भविष्यात, मानव आणि एआयमधील ही दरी हळूहळू संपेल.
कोणती भाकितं ठरली खरी ?
रे कुर्झवेल फक्त दावा करत नाहीत तर त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी, अनेक भाकितं आधीच खरी ठरली आहेत :
– 1990 साली ते म्हणाले होते की 2000 पर्यंत कोणताही माणूस बुद्धिबळात संगणकाला हरवू शकणार नाही.
हे 1997 मध्ये खरे ठरले, तेव्हा आयबीएमच्या ‘डीप ब्लू’ संगणकाने जागतिक बुद्धिबळ विजेता गॅरी कास्पारोव्हचा पराभव केला.
– 1999 मध्ये त्यांनी भाकीत केले होते की 2023 पर्यंत फक्त 1000 डॉलर्स किमतीचा लॅपटॉप मानवी मेंदूइतकी माहिती साठवू शकेल.
हेही खरं ठरलं आहे – आजचे AI -आधारित संगणक आणि लॅपटॉप अत्यंत वेगवान आणि बुद्धिमान आहेत.
– 2010 सालापर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात जलद वायरलेस इंटरनेट उपलब्ध होईल
हेही आजचं वास्तव आहे. जेव्हा 4जी हे भारतातील खेड्यांमध्ये पोहोचलंय आणि 5 जी सामान्य होतंय.
आगामी वर्षांत काय होणार ?
रे कुर्झवेल यांच्या मते, पुढील काही वर्षांत :
– नॅनोटेक्नॉलॉजी सामान्य होईल
– एआय आणि मानव एकमेकांशी जोडले (Fusion) जातील
– डिजिटल अमरत्वाचा (Digital Immortality) युग येईल – म्हणजेच, तुमचा मेंदू क्लाउडमध्ये सुरक्षित असेल, जो पुन्हा डाउनलोड करता येईल.