मंथन – चालते-फिरते बॉम्ब अन् ठिणगीची भीती
Marathi August 03, 2025 09:26 AM

>> योगेश मिश्रा

सगळा समाज आनंदी, सुखी आहे असा समज साशंक ठरावा अशी आजची परिस्थिती आहे. आनंद आहे तर तो लोकांच्या चेहऱयावर दिसायला हवा. पण… कदाचित काही लोक हे सगळे नाकारतील. सगळीकडे आनंदपर्व आहे असे सांगतील, पण कुणी तरी त्यांना विचारून पहा, जर सगळं शांत आहे, अमन-चैन आहे, कायद्याचं राज्य आहे, पैसा आहे, रोजगार आहेत, आरोग्य आहे, मग लोक खूश का नाहीयेत? हॅप्पीनेस इंडेक्समध्ये
आपण शून्यावर का आहोत?

पार्किंगमध्ये गाडी उभी केल्यावरून भांडण आणि खून, रस्त्यावरून जाताना गाडी थोडीशी लागली म्हणून जीवघेणा हल्ला, ओव्हरटेक करू दिले नाही म्हणून गोळी झाडणे, घरगुती भांडणांमुळे आत्महत्या किंवा खून, प्रियकर-प्रेयसीच्या भांडणात एखाद्याचे तुकडे तुकडे करून टाकणे ही यादीही रोजचीच आणि अंतहीन आहे. कधी कुठे कोणाचा राग बॉम्बसारखा फुटेल आणि सगळे भस्मसात करेल, हे काही सांगता येत नाही.

लोकांच्या मनात, हृदयात आणि डोक्यात इतका संताप, इतके विष, इतकी स्फोटके भरली आहेत की, जणू सगळे जण चालते-फिरते बॉम्ब झाले आहेत. कधी कुठल्या गोष्टीवर फुटतील याचा काहीही अंदाज नाही. या चालत्या-फिरत्या बॉम्बसाठी फक्त एक ठिणगी, एक ट्रिगर पुरेसा आहे आणि ती ठिणगी सगळीकडे पसरलेली आहे.

रोजच्या बातम्यांची यादी करून पहा. बिहारमध्ये एका बेशुद्ध मुलीवर अॅम्ब्युलन्समध्ये सामूहिक बलात्कार, यूपीमध्ये पतीच्या मृतदेहासोबत अॅम्ब्युलन्समध्ये जात असलेल्या महिलेसोबत बलात्कार, ठिकठिकाणी पोलीस ठाण्यांमध्ये छळ-मर्डर, रुग्णालयात बेशुद्ध रुग्णावर बलात्कार, न्यायाधीशाच्या घरात खोलीभर नोटा, विद्यापीठांमध्ये शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण, ओडिशामध्ये वनाधिकाऱयाच्या घरात कोटय़वधींची रोकड आणि सोने, हरयाणात अपहरणाच्या आरोपीला सरकारी वकील बनवले जाणे, कर्नाटकमध्ये शेकडो बलात्कार-मर्डरची कहाणी इत्यादी… इत्यादी किती मोजायचे? ही यादी संपणारच नाहीये का? आज केवळ अशाच बातम्या रोज असतात. बातम्या येतात निलंबनाच्या, अटकेच्या, जप्तीच्या, शिक्षा झाल्याच्या, पण घटना थांबत नाहीत, उलट वाढतच आहेत.

आपण सगळे अशा बातम्या वाचून, ऐकून, पाहून, सहन करून, ‘इम्युन’ तर झालेलो नाही आहोत ना? लोकांच्या मानसिकतेवर या सर्वाचा काही परिणाम होत नाहीये का? की अशाच घटना आणि आसपासचे वातावरण त्यांना चालते-फिरते बॉम्ब बनवते आहे? किंबहुना बनवलेच आहे?

खरे पाहता आपण तर शांतीचे झेंडे उंचावणारे म्हणून ओळखले जातो. ही भूमी बुद्धांची आहे, ज्यांनी फक्त शांतीचाच संदेश दिला. ही जमीन गांधींचीही आहे, ज्यांनी फक्त आणि फक्त अहिंसाच सांगितली. आपली भूमी तीर्थभूमी आहे. मग इतका राग का? कुठून भरली जात होती ही स्फोटके कधी विचार केलात का? कधी प्रश्न उभे राहत आहेत का? ही स्फोटके फक्त हिंसा करत नाहीयेत, तर शरीर आणि मेंदूला आजारांनी बरबाद करताहेत, पण यावर ना कुठे चर्चा होते, ना कुणाला काळजी आहे. एखादी घटना घडली की, फक्त एक वरवरची कारवाई होते आणि प्रकरण संपवले जाते. रोगावर उपचार नाहीच होत, फक्त तो झाकला जातोय.

कदाचित काही लोक हे सगळे नाकारतील. सगळीकडे आनंदपर्व आहे असे सांगतील, पण कुणी तरी त्यांना विचारून पहा, जर सगळं शांत आहे, अमन-चैन आहे, कायद्याचं राज्य आहे, पैसा आहे, रोजगार आहेत, आरोग्य आहे, मग लोक खूश का नाहीयेत? हॅप्पीनेस इंडेक्समध्ये आपण शून्यावर का आहोत? सगळे खूश आहेत, तर ते दिसत का नाही? फक्त नाचून गाऊन ‘रील्स’ बनवणं हाच आता आनंदाचा मापदंड बनला आहे का?

आज रुग्णालयांमध्ये पहा. रोज रुग्णांची गर्दी दिसते. हे काय आनंदाचे प्रतीक आहे? न्यायालये, ट्रेन्स आणि मंत्र्यांच्या ‘जनता दरबारां’पर्यंत जिकडे पाहावं तिकडे फक्त गर्दीच गर्दी दिसते. हे सगळं आनंददायी समाजाचं प्रतिबिंब आहे का?

एक प्रश्न असाही उरतो, तो म्हणजे या सगळ्यामध्ये दोन भारत आहेत का? एक असा भारत जिथे लोकांकडे धनबल, राजकीय शक्ती, बाहुबल आहे. ज्या लोकांसाठी व्हीआयपी व व्हीहीआयपी सुविधा आहेत. ज्यांच्यासाठी कायदा आपला मार्ग बदलतो. जे पैसे देऊन लोकांना विकत घेऊ शकतात. जे राजा-महाराजासारखे ‘जनता दरबार’ भरवतात, इतरांचं आयुष्य ठरवतात. ज्यांच्याकडे एका व्यक्तीसाठी पूर्ण ट्रेन चालते. जे घरात हजारो कोटी रुपये ठेवतात.

दुसरीकडे एक वेगळा भारत आहे. जिथे बेरोजगारी आहे, निराशा आहे, शक्तिहीन लोकांचा समुदाय आहे, जे लोक पोलीस ठाण्यात छळ-मर्डरचे शिकार होतात, ज्यांना ट्रेनमध्ये शिपायापासून टीसीपर्यंत लुटले जाते, ज्यांना सरकारी कार्यालयांत धक्के खावे लागतात, ज्यांची जमीन-मकान-शेती बळकावली जाते, ज्यांच्या महिलांवर अॅम्ब्युलन्सपासून रुग्णालयात बलात्कार होतो, ज्यांना उपचारासाठी तासन्तास, आठवडे-महिने रुग्णालयांचे फेरे मारावे लागतात, ज्यांना काम मिळत नाही पण मोफत धान्य मिळतं, ज्यांना लग्न या शब्दानेही भीती वाटते, जे व्हीआयपींना रस्ता द्यायला बाजूला फेकले जातात, जे स्वतच्याच प्रतिनिधीसमोर ‘जनता दरबार’मध्ये हात जोडून विनवण्या करतात, जे रक्त व मूत्रपिंड विकायला मजबूर आहेत, जे शिपाई बनले तरी आयुष्य धन्य मानतात, जे मूत्रपिंड विकून अमेरिकेत पळून जाण्यास तयार आहेत… काय काय मोजावं, या वर्गाची यादी वाढतच चाललेली आहे. ही जमात आपला हॅप्पीनेस इंडेस वाढवेल का? त्यांच्या मनात स्फोटकाऐवजी अत्तराचा सुगंध आणि भवताल प्रसन्न करणारी फुलं उमलतील का? नाही. असं विचारणंही मूर्खपणाचं ठरेल.

ब्रिटिशांनी घडवलेल्या अनेक व्यवस्था आपण संपवल्या, कायदे बदलले, म्हणायला गेलं तर 1947 पासून 2025 पर्यंत अनेक दावे झाले. लोकांना आनंद देण्याचे, जीवन सुलभ करण्याचे, पण शेवटी परिणाम काय आहे? अॅम्ब्युलन्समध्ये बलात्कार, पोलीस ठाण्यात मर्डर आणि सरकारी कर्मचाऱयाच्या घरी शेकडो कोटी रुपये?

अजून वेळ गेलेली नाही. वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण आज हा राग वैयक्तिक पातळीवर आहे, जर तो संघटित झाला तर तो संकटच ओढवणार. इतिहास साक्षीदार आहे आणि आपण तुम्ही सगळे पाहिलंच आहे की संघटित संताप काहीही करू शकतो, तो निर्मिती काहीही करत नाही, पण सगळं भस्मसात करण्याची क्षमता त्यात असते. मग आपण भस्म होण्याचीच वाट पाहायची का?

जगात प्रत्येक देशात, प्रत्येक समाजात तणाव असतोच, पण एवढा संताप कदाचित कुठेही दिसत नाही. खरं म्हणजे भारत वगळता अन्य देशांना फार फार तर 2600 वर्षांची परंपरा आहे, पण आपण अनंत काळापासून आहेत म्हणूनच आपण सनातनी म्हणवतो. पण हे 2600 वर्षांचे लोक आपल्यासारखे स्फोटकांनी भरलेले नाहीत. मग आपणच असे का झालो? आपण तर अमृतकालात चाललो आहोत.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार-विश्लेषक आहेत.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.