>> यादव तरटे पाटील
नुकत्याच झालेल्या जागतिक व्याघ्र दिनाची मध्यवर्ती संकल्पना 'त्यांचे भविष्य आमच्या हातात' (त्यांचे भविष्य आपल्या हातात) अशी आहे. वाघांच्या संरक्षणासाठी मानवी जबाबदारीवर आणि सामूहिक प्रयत्नांवर भर देणाऱया या संकल्पनेद्वारे वाघ आणि मानव यांच्या संघर्षाची धार कमी होण्यासाठी मदत होईल अशी आशा करायला हरकत नाही.
सध्या विदर्भातील मानव आणि वाघाचा संघर्ष शिगेला पोहोचलाय. त्यातल्या त्यात सर्वाधिक संघर्ष हे एकटय़ा चंद्रपूर जिह्यात झालेले आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि ब्रह्मपुरी वनक्षेत्र जगाच्या नकाशावर आलंय. या एकटय़ा जिह्यात सन 2003 पासून आजपावेतो किमान दीडशेहून अधिक माणसांचा बळी गेलाय. सन 2014 या एकाच वर्षात तब्बल सोळा माणसांना जीव गमवावा लागला, तर सन 2010 मध्ये 17 माणसांचा बळी चंद्रपूर जिह्यात गेला. म्हणजेच दरवर्षी सरासरी 12 ते 14 व्यक्ती एकटय़ा चंद्रपूर जिह्यात वन्य जीवांच्या हल्ल्यात मृत पावतात, तर आजवर किमान दोनशे माणसं घायाळ झालेली आहेत. वाघ आणि प्राण्यांच्या हल्ल्यात दरवर्षी बाराशेच्या आसपास गाई आणि बैलांचा बळी गेलाय. हा संघर्ष आता केवळ वाघ आणि मानव यांच्यापुरताच मर्यादित राहिलेला नाही. तर हा संघर्ष आता जमिनीच्या उपयोगाचा संघर्षदेखील बनला आहे. वनक्षेत्राच्या तुलनेत वाघांची वाढलेली संख्या, धोक्यात आलेला व्याघ्र अधिवास आणि संचार मार्ग, व्याघ्र संरक्षित क्षेत्रातील व्याघ्र संख्येचे नियमन अधिक प्रभावी करणे महत्त्वाचे आहे या बाबी डोळ्यात अंजन घालायला लावणाऱया आहेत.
व्याघ्र प्रकल्प हा भारतातील वाघांच्या संरक्षणासाठी भारत सरकारने सन 1973 मध्ये सुरू केलेला एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. जुलै 2025 पर्यंत या प्रकल्पांतर्गत भारतात तब्बल 58 व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आलेले आहेत. वाघांचे नैसर्गिक अधिवास जपणे व त्यांची संख्या वाढवणे तसेच त्यांचे संरक्षण करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. दरवर्षी संपूर्ण जगात 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यात येतो. सन 2010 मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या व्याघ्र परिषदेमध्ये हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. जागतिक व स्थानिक पातळीवर वाघांच्या संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या संरक्षणासाठी लोकसहभाग वाढविणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
सन 2025 साठीच्या जागतिक व्याघ्र दिनाची मध्यवर्ती संकल्पना ही “Their Future in Our Hands” (त्यांचे भविष्य आपल्या हातात) अशी आहे. ही मध्यवर्ती संकल्पना वाघांच्या संरक्षणासाठी मानवी जबाबदारीवर आणि सामूहिक प्रयत्नांवर भर देते. व्याघ्र प्रकल्प हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. मात्र यामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या या संकल्पनेमुळे वाघ आणि मानव यांच्या संघर्षाची धार कमी होण्यासाठी मदत होईल अशी आशा करायला हरकत नाही. सुरुवातीला सन 2010 मध्ये Tx2 Initiative अशा स्वरूपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. यामध्ये सन 2010 पासून वाघांची संख्या दुप्पट करण्याचा मानस होता. हे उद्दिष्ट भारताने आधीच पूर्ण केले आहे. डिसेंबर 2023 पर्यंत भारतात सुमारे 3682 वाघ होते, जे जगातील एकूण वन्य क्षेत्रातील वाघांच्या संख्येच्या सुमारे 75 टक्के आहेत. हे एक मोठं यश म्हणावं लागेल. मात्र याच वेळी वन्य जीव क्षेत्राबाहेरील इतर क्षेत्रांत वावरणाऱया वाघांना अभय देण्यात मर्यादा निर्माण झाल्या होत्या. शिवाय मानव-वन्य जीव संघर्षाची धारही तीव्र होत चालली आहे. म्हणूनच अलीकडे सन 2025 मध्ये वाघांच्या संरक्षणासाठी आणखी एक नवीन प्रकल्प आणि त्यांच्या उपाययोजनांवर देण्यासाठी पाऊले उचलण्यात आलेली आहेत. त्यामध्ये `Tigers Outside Tiger Reserves` (TOTR) प्रकल्प लवकरच 17 राज्यांमध्ये सुरू केला जाणार आहे. याचा मुख्य उद्देश व्याघ्र प्रकल्पांच्या बाहेर असलेल्या वाघांमुळे होणारा मानव-वाघ संघर्ष कमी करणे हा आहे.
मानव आणि वाघ आता एक जागतिक प्रश्न आहे. त्याची तीव्रता आता अधिक वाढली आहे. गेल्या काही वर्षांत विदर्भातील वाघ असलेल्या प्रदेशात वेगाने बदल होत चाललाय. वन जमिनीवरील वाढते अतिक्रमण, धोक्यात आलेले व्याघ्र संचार मार्ग, शिकार आणि अवैध व्यापार, निर्वनीकरण, रस्ते आणि विकास प्रकल्प यातून व्याघ्र अधिवास धोक्यात आले आहे. मात्र एकीकडे गेल्या काही वर्षांत कमी झालेली वाघांची संख्या आता वाढली, तर दुसरीकडे लोकसंख्यादेखील मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. गेल्या शतकात वाघांच्या अधिवासात एकूण 57 टक्के लोकसंख्यावाढ झाली आहे. म्हणजेच वाघ गावांकडे आणि माणसे जंगलाकडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषत विदर्भात मानव व वन्य जीव संघर्ष रौद्ररूप धारण करतोय. एक वाघ 14 ते 15 लोकांचा बळी घेतो आहे, तर दुसरीकडे वाघांना आपला जीव मुठीत धरून जगण्याची वेळ आली आहे. उत्तर भारत तथा मध्य प्रदेशमधील टोळ्या विदर्भातील याच जंगलात येऊन वाघांची शिकार करतात. व्याघ्रभूमी असलेल्या देशाला लागलेली ही एक मोठी कीडच म्हणावी लागेल.
अलीकडे वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आपण पाहतो आहे. या शतकाच्या सुरुवातीला जगात एक लाख, तर भारतात चाळीस हजार वाघ होते. त्य तुलनेत विचार केल्यास वाघांची संख्या कमी झालेली आहे. वाघांच्या चाळीस हजारांच्या तुलनेत आता फक्त अंदाजे 2965 वाघच देशात उरले आहेत. सन 1951 मध्ये 36 कोटी असलेली भारताची लोकसंख्या आता 135 कोटींवर गेली आहे. सर्व व्याघ्र अधिवासांचा विचार केल्यास कोळसा खाणी, लोह खनिज, सिमेंट व इतर कारखानदारी व्यवसाय येथील जंगलामध्ये आलेले आहेत. या सर्व खाणींच्या पसाऱयात वाघांची फरफट होताना आपण पाहतो आहे. बेघर झालेले हे वाघ मग मनुष्यवस्त्यांकडे येऊन हल्ला करत असतील तर त्याला कारणीभूत कोण? वाघ की आम्ही? या प्रश्नाचे उत्तर आता आम्हाला ठरवायचे आहे. प्रत्येक वेळी या संघर्षाचा शेवट वाघांचा बळी घेऊनच संपत असतो. यवतमाळ जिह्यातील मारलेला वाघ, चंद्रपूर जिह्यातील नागभीड व पोंभुर्णामध्ये मारलेला वाघ, गोंदिया जिह्यातील नवेगाव बांधमध्ये मारलेला वाघ हे सर्व नरभक्षक होतेच, परंतु यापैकी कोणत्याही वाघांना जिवंत पकडले गेले नाही हेही वास्तव नाकारून चालणार नाही. यवतमाळ जिह्यातील ‘अवनी’ असे नामकरण झालेल्या वाघिणीला मारण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ लागला. शेवटचा एक महिना ती कुणाला दिसलीसुद्धा नाही. या कालावधीत तिने कोणत्याही माणसावर हल्ला केला नाही, परंतु तिला शोधण्यासाठी नागपुरातून दुसऱया वाघाचे मूत्र आणून झाडावर शिंपडले गेले. मुत्राच्या वासावर ती वाघीण आली आणि त्यात तिचा बळी गेला. ब्रह्मपुरी ते वर्धा आणि वर्धा ते परत ब्रह्मपुरी असा तब्बल 700 किमीचा प्रवास करणारी ‘टी 27’ वाघीणसुद्धा याचाच एक भाग होती.
विदर्भात मानव आणि वाघांचा संघर्ष अधिक आहे. या भागातील जंगल कमी झाले आहे. तसेच त्यांच्या संचार मार्गात नव्याने शेती, विकास प्रकल्प, मनुष्यवस्त्या, रस्ते आल्यामुळे माणसांवरील हल्लेसुद्धा वाढले आहेत. या सर्वांची दिशा ही विनाशाकडे जाणारी आहे. मात्र आशादायी चित्र निर्माण करण्यासाटी एक सर्वव्यापक निसर्ग चळवळ उभारण्याची खरी गरज आहे.
www.yadavtartepatil.com
(लेखक महाराष्ट्र राज्य वन्य जीव मंडळाचे माजी सदस्य आहेत.)