तळेगाव स्टेशन, ता २ : विविध सण समारंभांसह लग्नकार्यात वाजविल्या जाणाऱ्या कर्णकर्कश डीजेच्या दणदणाटाला येत असलेले बीभत्स स्वरूप रोखण्यासाठी तळेगाव दाभाडे येथील अकरा समाजसेवी संस्था एकवटल्या आहेत. डीजेचा वापर करणाऱ्यांची प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष पाठराखण न करण्याबाबत निवेदन देऊन सर्व संस्थानी एकजुटीने सर्वपक्षीय नेत्यांना गळ घातली आहे.
ध्वनीमर्यादा निश्चितीबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश झुगारून विविध सणोत्सव आणि लग्नकार्यात ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करत प्रखर लेझर लाईटसह डीजेचा कर्णकर्कश आवाजात मिरवणुका काढल्या जात आहेत. डीजेचा दणदणाट हा १५० डेसीबलपेक्षाही अधिक असतो. एक तंदुरुस्त व्यक्ती ७० डेसीबलपर्यंत ध्वनीची तीव्रता सहन करू शकतो. त्यापेक्षा अधिक आवाजाच्या ध्वनी प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर घातक परिणाम होतात. आर्टियल हायपरटेंशन म्हणजेच हृदयावर ताण येणे, मायोकार्डियल इंफ्रॅक्शन म्हणजे हृदयाचा झटका येण्यासारखे त्रास होऊ शकतात. ब्रेन हॅमरेज, गर्भपात होऊ शकतो. तसेच हृदय, कान, डोळे, आणि मेंदूवर मानसिक आरोग्यावरही अत्यंत विपरीत परिणाम होऊ शकतो. डीजेसोबतच्या लेझर लाइटमुळे डोळ्यांतील रेटिनावर परिणाम होऊ शकतो असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, डीजेबाबत छुप्या राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिस यंत्रणा देखील या प्रकाराला प्रतिबंध घालण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतानाचे सार्वत्रिक चित्र पाहायला मिळते. याचाच त्रास आजूबाजूचे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, हृदयरोगी, महिला आणि मुलांना सहन करावा लागतो आहे. मात्र, आता हे चित्र बदलण्यासाठी मानवी स्वास्थ्याला अपायकारक ठरणाऱ्या डीजेवर बंदी घालण्याचा निर्धार तळेगाव दाभाडे परिसरातील फ्रेंड्स ऑफ नेचर, ध्वनिप्रदूषण विरोधी मंच, शेजार ज्येष्ठ नागरिक संघ, ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ, जागरूक वाचक कट्टा, निसर्गराजा, कलापिनी, सामाजिक सहयोग उपक्रम संस्था (कॅप), रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव आदींसह इतरही काही संस्थांकडून तळेगाव दाभाडे परिसरात लेझर लाईटसह डीजेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. या संस्थांतर्फे मावळचे आजी माजी आमदार, खासदार, पोलिस अधिकारी आदींना निवेदने देण्यात आली आहेत.
फ्रेंड्स ऑफ नेचरचे संस्थापक महेश महाजन, गणेश सोरटे, गणेश भोसले, मारुतराव सावंत, ध्वनिप्रदूषण विरोधी मंचाचे दीपक जयवंत, अशोक बकरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष परदेशी, दीपक फल्ले, प्रशांत ताये, प्रदीप टेकवडे, जागरूक वाचक कट्टाचे संदीप गोंदेगावे, माजी नगरसेवक अरुण माने, कॅपचे अध्यक्ष प्रदीप साठे, शेजार ज्येष्ठ नागरिक संघाचे विश्वास देशपांडे, ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या नंदिनी टाले, संपदा नातू आदींसह ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.