Nashik News : देशी दारूच्या दुकानावरून नाशिकमध्ये नगरसेवकांमध्ये वाद, भाजप-शिंदेसेनेचे नेते आमने-सामने
Saam TV August 02, 2025 11:45 PM
  • नाशिकच्या चुंचाळे शिवारात देशी दारू दुकान सुरू होण्याच्या विरोधात भाजपचा आक्रमक विरोध.

  • शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मामा ठाकरे हे दुकान सुरू करत असल्याचे उघड.

  • महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग; सामाजिक घातक परिणामांविरोधात आवाज.

  • दुकान परवानगी रद्द न झाल्यास आंदोलनाचा इशारा; प्रशासनाकडे निर्णयाची प्रतीक्षा.

तरबेज शेख, नाशिक प्रतिनिधी

नाशिकमधील चुंचाळे शिवारामध्ये सुरू होणाऱ्या देशी दारू दुकानावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजप या मित्र पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मामा ठाकरे यांच्या मालकीच्या असलेल्या या नवीन दारू दुकानाच्या विरोधात भाजपचे माजी नगरसेवक राकेश दोंदे यांनी जोरदार आवाज उठवला. या दुकानामुळे परिसरात सामाजिक समस्या निर्माण होतील, अशा कारणास्तव स्थानिक नागरिकांसह महिलांनीही या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

दोंदे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिलं असून, या दुकानाला परवानगी देण्यात आली, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. यावेळी परिसरातील अनेक महिलांनीही आवाज उठवत, आपल्या परिसरात अशा दुकानांची गरज नाही अशी ठाम भूमिका घेतली. महिलांच्या वतीने, समाजामध्ये व्यसनाधीनतेची वाढ, कुटुंबांमधील भांडणं आणि मुलांवर होणारा परिणाम यासारख्या समस्या अधोरेखित करण्यात आल्या.

Nashik: पती-पत्नीच्या नात्याला काळीमा, अश्लील व्हिडिओ काढले अन् बायकोला डान्सबारमध्ये नाचवलं

राकेश दोंदे यांनी मामा ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधत जर त्यांना समाजसेवा करायची असेल तर सकारात्मक उपक्रम राबवा अशी प्रतिक्रिया दिली. "दारू दुकान उघडून समाज बिघडवण्यापेक्षा शिक्षण, आरोग्य किंवा महिलांसाठी काही विधायक काम करा," असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच, हे दुकान बंद करण्यात आलं नाही तर मामा ठाकरे यांच्या घरा समोरच आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Nashik News : ईडीचा माजी आयुक्ताला दणका; कोट्यवधींची मालमत्ता जप्त, एका कृत्याने संशय बळावला

या आंदोलनात स्थानिक पुरुष आणि महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. परिसरात यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दारू दुकानाच्या परवानगीसाठी सुरू असलेल्या प्रक्रियेमुळे एकाच सत्ताधारी युतीतील दोन पक्षांत वाद निर्माण होणं, हे नाशिकच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.

नाशिकमधील वाद का निर्माण झाला?

शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवक मामा ठाकरे यांच्या देशी दारू दुकानाला भाजपचे माजी नगरसेवक राकेश दोंदे यांनी विरोध केला.

या दारू दुकानाच्या विरोधात कोण उभं राहिलं?

स्थानिक महिला, नागरिक आणि भाजपचे माजी नगरसेवक राकेश दोंदे.

विरोध करणाऱ्यांची मुख्य कारणं काय आहेत?

व्यसनाधीनतेत वाढ, समाज बिघडणे, कुटुंबातील हिंसाचार, आणि मुलांवर परिणाम.

आंदोलनाचा इशारा कुठे दिला गेला?

मामा ठाकरे यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.