वासुकी या चेन्नईतील एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांना बऱ्याच काळापासून स्नायू दुखणं आणि थकवा जाणवणं अशा समस्या जाणवत होत्या.
त्या सांगतात, "मला वाटलं होतं की कदाचित तणाव किंव अपुऱ्या झोपेमुळे हा त्रास होत असावा."
अनेक महिने त्यांनी हा त्रास असाच सहन केला. मात्र शेवटी त्यांनी डॉक्टरकडे जाण्याचं ठरवलं. डॉक्टरांची त्यांची तपासणी केली. वासुकी यांचे रिपोर्ट पाहून डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला.
त्यांच्या रक्ताच्या तपासणीतून समोर आलं की त्यांच्या शरीरातील व्हिटॅमिन डी ची पातळी अतिशय गंभीररित्या खालावली होती.
डब्ल्यूएचओच्या अहवालात काय म्हटलं आहे?जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आग्नेय आशिया पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये एक अभ्यास प्रकाशित झाला आहे. हा अभ्यास, "दिल्लीतील शहरी आणि ग्रामीण भागांमधील व्हिटॅमिन डी ची कमतरता आणि त्यामागची कारणं" यावर करण्यात आला आहे.
या अभ्यासानुसार, शहरी भागांमध्ये राहणाऱ्या जवळपास 70 टक्के लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची गंभीर स्वरुपाची कमतरता आहे. तर ग्रामीण भागातील लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता असणाऱ्यांची संख्या जवळपास 20 टक्के आहे.
या अभ्यासात दिल्ली एनसीआरमधील शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांचा समावेश होता.
रक्तामध्ये व्हिटॅमिन डी ची पातळी 30 नॅनोग्रॅमपेक्षा अधिक असली पाहिजे. मात्र व्हिटॅमिन डी ची पातळी 10 नॅनोग्रॅमपेक्षा कमी झाल्यास त्याला गंभीर मानलं जातं.
या अभ्यासानुसार, शहरी भागातील ज्या लोकांचा अभ्यास करण्यात आला, त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन डी ची सरासरी पातळी 7.7 नॅनोग्रॅम होती. तर ग्रामीण भागातील लोकांमध्ये हे प्रमाण सरासरी 16.2 नॅनोग्रॅम होतं.
शहरी भागातील लोकांप्रमाणेच, ग्रामीण भागातील लोकांमध्ये देखील व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे. मात्र ग्रामीण भागातील लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची पातळी गंभीर असण्याचं प्रमाण कमी होतं.
जागतिक आरोग्य संघटनेच्या या अहवालात हे देखील म्हटलं आहे की पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता अधिक दिसून येते.
दक्षिण भारतात काय स्थिती आहे?दिल्लीसारख्या उत्तर भारतातील राज्यातील महिलांबरोबरच दक्षिण भारतातील तामिळनाडूसारख्या राज्यातील महिलांमध्ये देखील व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्याचं आढळून आलं आहे.
चेन्नईतील गरोदर महिलांचा एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात आढळलं की त्यातील 62 टक्के महिलांमध्ये व्हिटॅमिन डी कमी असल्याचं दिसलं.
केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसमध्ये एक अभ्यास प्रकाशित झाला होता. तो चेन्नईतील अनेक जणांवर करण्यात आला होता. दक्षिण भारतातील शहरी भागातील लोकांमध्ये असलेल्या व्हिटॅमिन डी च्या कमतरतेबाबत हा अभ्यास करण्यात आला होता.
या अभ्यासात सहभागी होणाऱ्या 66 टक्के लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्याचं आढळून आलं. मग हे लोक मधुमेहाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असोत की त्यांना टाईप 2 मधुमेह झालेला असो, त्यांच्यात व्हिटॅमिन डी ची कमतरता आढळून आली.
पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आणखी अधिक प्रमाणात आढळून आली.
पंजाब, तिरुपती, पुणे आणि अमरावती सारख्या भागात हा अभ्यास करण्यात आला. तिथे देखील शहरी भागातील लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता अधिक प्रमाणात आढळली.
यामागचं कारण काय आहे?व्हिटॅमिन डी प्रामुख्यानं सूर्यप्रकाशामधून मिळतं. भारताच्या उत्तर भागातील राज्यांना वगळता इतर भागात वर्षभर चांगलं उन्ह, सूर्यप्रकाश असतं. मग तरीदेखील चेन्नईसारख्या उष्णकटिबंधीय भागातील शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची तीव्र कमतरता का आहे?
डॉक्टर दक्षिणामूर्ति, चेन्नईतील त्वचारोग तज्ज्ञ आहेत. ते म्हणतात की शरीराला व्हिटॅमिन डी सूर्यप्रकाश आणि अन्नातून मिळतं.
ते सांगतात, "सूर्याची अल्ट्रा-व्हायोलेट किरणं जेव्हा त्वचेवर पडतात, तेव्हा त्वचेच्या वरच्या थरात असणारा 7- डिहायड्रोकोलेस्टेरॉल नावाचं कंपाउंड किंवा संयुगाचं रुपांतर व्हिटॅमिन डी-3 मध्ये होतं. त्यानंतर यकृत आणि मूत्रपिंड त्याचं रुपांतर व्हिटॅमिन डी मध्ये करतात."
डॉक्टर पीटर, पुदुचेरीमधील सरकारी हॉस्पिटलमधून निवृत्त झाले आहेत. ते म्हणाले की, "आधुनिकीकरण आणि कामाच्या बदललेल्या संस्कृतीमुळे (वर्क कल्चर) लोकांचा बहुतांश वेळ घर आणि कार्यालयात जातो."
"संपूर्ण शरीरभर कपडे परिधान करण्याच्या सवयीमुळे, बाहेर पडल्यावर देखील उन्ह किंवा सूर्यकिरणं थेट त्वचेपर्यंत पोहोचत नाहीत."
लोकांना वाटतं की काही मिनिटं बाहेर राहिल्यामुळे शरीराला पुरेसं उन्ह मिळतं. मात्र प्रदूषण, कपडे आणि काचेच्या खिडक्यांमुळे पुरेसा सूर्यप्रकाश शरीरापर्यंत पोहोचत नाही.
किती वेळ उन्हात राहिलं पाहिजे?एका अभ्यासानुसार, एखाद्या भारतीयाला जर शरीरात व्हिटॅमिन डी चं प्रमाण 30 नॅनोग्रॅम इतकं हवं असेल, तर त्यानं दररोज किमान 2 तास चेहरा, हात आणि अंगावर थेट उन्ह किंवा सूर्यप्रकाश घेतला पाहिजे.
जर एखाद्याला शरीरात व्हिटॅमिन डी ची आवश्यक असलेली किमान 20 नॅनोग्रॅमची पातळी राखायची असेल, तर त्यानं दररोज कमीत कमी एक तास उन्हात राहणं आवश्यक आहे.
जर तुम्हाला व्हिटॅमिन डी हवं असेल तर डॉक्टरांचं म्हणणं आहे की, खिडकीच्या काचेतून येणारा सूर्यप्रकाश किंवा उन्ह टाळलं पाहिजे.
चेन्नईतील त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर दक्षिणामूर्ती म्हणतात, "सुर्याची यूव्हीबी किरणं शरीरात व्हिटॅमिन डी तयार होण्यास मदत करतात. अभ्यासातून समोर आलं आहे की सर्वसामान्यपणे सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ही किरणं अधिक प्रमाणात असतात."
"सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळेस सूर्याच्या किरणांमध्ये यूव्हीए अधिक प्रमाणात असतं. व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी ते सहाय्यकारी नसतं. त्यामुळेच सकाळच्या वेळेस जरी सूर्यप्रकाश तीव्र वाटला तरी त्यातून फारसा फायदा होत नाही."
यामागचं वैज्ञानिक कारण असं आहे की पृथ्वीच्या वातावरणात सूर्य जेव्हा क्षितिजाच्या जवळ असतो (म्हणजे पहाटे किंवा संध्याकाळी), तेव्हा यूव्हीबी किरणं वातावरणातून जाताना बऱ्याच प्रमाणात अडवली जातात.
सूर्याचा कोन जेव्हा 45 अंशापेक्षा कमी असतो, तेव्हा ही बहुतांश किरणं जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाहीत.
डॉक्टर दक्षिणामूर्ति असंही सांगतात की जास्त काळ उन्हात राहिल्यामुळे नुकसान देखील होऊ शकतं.
ते म्हणतात, "आपल्याला माहित आहे की त्यावेळेस सूर्यकिरणं खूप तीव्र असतात. त्यामुळेच खूप जास्त वेळ उन्हात थांबू नये. त्याचबरोबर कमी प्रमाणात सनस्क्रीन लावावं, टोपी घालावी, हलके कपडे घालावे आणि गॉगल वापरावा."
अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार, हात, पाय आणि चेहऱ्यावर फक्त 5 ते 30 मिनिटं ऊन घेणं पुरेसं असतं. यापेक्षा अधिक वेळ उन्हात राहू नये.
हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या वेबसाईटवरील एका लेखानुसार, सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेदरम्यान (अमेरिकेत) शरीराच्या 10 टक्के भागावर ऊन पडू दिलं पाहिजे.
ही वेळ प्रत्येक देशात थोडीफार वेगळी असू शकते. एका गाईडमध्ये म्हटलं आहे की ब्रिटनमध्ये सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेदरम्यान काही वेळ उन्हात राहिल्यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळू शकतं.
यामध्ये असंही म्हटलं आहे की डार्क स्किन असणाऱ्या लोकांनी थोडा अधिक वेळ उन्हात राहण्याची आवश्यकता असू शकते.
व्हिटॅमिन डी च्या कमतरतेची लक्षणंथकवा, सांधेदुखी, पायात सूज येणं, जास्त वेळ उभं राहताना त्रास होणं, स्नायू दुर्बल होणं आणि मानसिक तणाव, ही सर्व व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्याची लक्षणं असू शकतात.
डॉक्टर पीटर म्हणतात, "वेगवान जीवनशैलीमुळे भारतीय लोक व्हिटॅमिन डी च्या कमतरतेला गांभीर्यानं घेत नाहीत. मात्र यामुळे हळूहळू शरीराचा प्रत्येक भाग, अंग कमकुवत होत जातं. वय वाढल्यानंतर यामुळे हाडं, स्नायू आणि सांधे यामध्ये तीव्र स्वरुपाच्या वेदना होऊ शकतात."
आणखी एका अभ्यासानुसार, व्हिटॅमिन डी च्या गंभीर स्वरुपाच्या कमतरतेमुळे तरुण वयातच डिमेन्शिया (स्मरणशक्ती कमकुवत होणं) सारख्या समस्यांचा धोका वाढू शकतो.
व्हिटॅमिन डी कसं मिळवावं?वासुकी सारख्या शहरी भागात राहणाऱ्या बहुतांश लोकांना दररोज सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेदरम्यान एक तास ऊन घेणं शक्य नसतं.
अर्थात भारतासारख्या देशात, विशेषकरून उन्हाळ्यात उन्हात फिरणं शक्य नाही.
डॉक्टरांच्या मते, असं केल्यास आरोग्य आणि त्वचेशी संबंधित इतर समस्या निर्माण होऊ शकतात.
त्यामुळे उन्हात थोडावेळ जरी फिरायचं असेल तर सनस्क्रिनचा वापर केला पाहिजे. तसंच डोकं झाकलेलं हवं.
जास्त उन्ह किंवा उष्णता असणाऱ्या दिवसांमध्ये व्हिटॅमिन डी ची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सप्लीमेंटची (पूरक पोषक घटक) देखील मदत घेतली जाऊ शकते.
डॉक्टर पीटर म्हणतात, "जेवणातून पुरेसं व्हिटॅमिन डी मिळवणं थोडं कठीण आहे. अंडी, मासे, दूध आणि व्हिटॅमिन डीनं समृद्ध असलेल्या अन्नपदार्थांचं सेवन केल्यामुळे काही प्रमाणात यात फायदा होऊ शकतो."
ते पुढे सांगतात की व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर करण्यासाठी काही सप्लीमेंट्सदेखील उपयोगी ठरू शकतात.
त्यांच्या मते, "तुम्ही कितीही सप्लीमेंट्स घेतली तरी, संधी मिळताच थेट उन्ह अंगावर घेणं, हीच व्हिटॅमिन डी मिळवण्याची सर्वात सोपी आणि मोफत पद्धत आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)