मोहम्मद सिराज याने पाचव्या कसोटी सामन्यात 14 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर झॅक क्रॉली याला क्लिन बोल्ड करत इंग्लंडला पहिला झटका दिला. यासह तिसर्या दिवसाचा खेळ संपला. भारताने इंग्लंडला विजयासाठी 374 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडने प्रत्युत्तरात दुसर्या डावात खेळ संपेपर्यंत 1 विकेट गमावून 50 धावा केल्या. क्रॉली 14 धावांवर बाद झाला. तर बेन डकेट 34 धावांवर नाबाद परतला आहे. त्यामुळे आता चौथ्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी आणखी 324 धावा कराव्या लागणार आहेत. तर भारतीय संघाला मालिका बरोबरीत करण्यासाठी फक्त 8 विकेट्सचीच गरज आहे. त्यामुळे आता चौथ्या दिवसाच्या खेळाकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
इंग्लंडचा दुसरा डावबेन डकेट आणि झॅक क्रॉली या सलामी जोडीने 374 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला संयमी सुरुवात करुन दिली. हे दोघे एकेरी-दुहेरी धावा जोडत राहिले. तर संधी मिळेल तेव्हा चौकार लगावले. दोघांनी अशाप्रकारे अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर मोहम्मद सिराजने दिवसाच्या शेवटच्या ओव्हरमधील (14) पाचव्या बॉलवर झॅकला बोल्ड करत ही जोडी फोडली. इंग्लंडला अशाप्रकारे पहिला झटका लागला. यासह तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्याचं जाहीर करण्यात आलं.
भारताचा पहिला डावइंग्लंडने टीम इंडियाच्या 224 धावांच्या प्रत्युत्तरात पहिल्या डावात 247 धावा करत 23 धावांची आघाडी घेतली. भारताने त्यानंतर दुसऱ्या डावात ऑलआऊट 88 षटकांमध्ये सर्वबाद 396 धावा केल्या. भारतासाठी दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल याने शतक ठोकलं. तर भारताच्या तिघांनी अर्धशतकी खेळी केली. तर इतरांनीही दुहेरी आकडा गाठत योगदान दिलं.
भारताने दुसऱ्या दिवशी केएल राहुल याच्यानंतर (7) साई सुदर्शन (11) याच्या रुपात 70 धावावंर दुसरी विकेट गमावली. त्यानंतर नाईट वॉचमॅन म्हणून आकाश दीप आला. आकाशने तिसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिलवहिलं अर्धशतक झळकावलं. आकाश 66 धावा करुन बाद झाला. आकाशनंतर कर्णधार शुबमन गिल 11 आणि करुण नायर 17 धावा करुन माघारी परतले. त्यानंतर यशस्वी 118 धावा करुन आऊट झाला.
यशस्वीनंतर रवींद्र जडेजा आणि ध्रुव जुरेल या दोघांनी सातव्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. ध्रुव 34 धाावंवर बाद धाला. त्यानंतर रवींद्र जडेजा अर्धशतक ठोकून माघारी परतला. जडेजाने 53 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने त्याच ओव्हरमध्ये मोहम्मद सिराज याला झिरोवर आऊट करत भारताला नववा झटका दिला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर याची साथ देण्यासाठी प्रसिध कृष्णा मैदानात आला
वॉशिंग्टने प्रसिधला सोबत घेत इंग्लंडच्या गोलंदाजांची इतकी धुलाई केली की बॉलचा आकार बदलला. त्यामुळे बॉल बदलावा लागला. सुंदरने त्यानंतरही फटकेबाजी सुरुच ठेवली. मात्र याच प्रयत्नात सुंदर आऊट झाला. सुंदर आणि प्रसिध या जोडीनी दहाव्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. सुंदरने 4 फोर आणि 4 सिक्ससह 46 बॉलमध्ये 53 रन्स केल्या. तर प्रसिध झिरोवर नॉट आऊट राहिला. इंग्लंडसाठी जोश टंग याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. गस एटकीन्सन याने 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर जेमी ओव्हरटन याने 2 विकेट्स मिळवल्या.