भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला इंग्लंड विरूद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील दुसर्या दिवशी रिलीज करण्यात आलं. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली. वर्कलोड मॅनेजमेंटच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता जसप्रीत बुमराहबाबत काही तासांत मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराह आशिया कप स्पर्धेत खेळणार नाही, असा दावा केला जात आहे. रिपोर्ट्सनुसार, बुमराह आशिया कप स्पर्धा किंवा विंडीज विरूद्धची कसोटी मालिका यापैकी एकाचीच निवड करेल, असं म्हटलं जात आहे. आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर त्यानंतर टीम इंडिया विंडीज विरुद्ध मायदेशात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
आशिया कपमध्ये बुमराह खेळणार नाही?आशिया कप स्पर्धेतील अंतिम सामना हा 29 सप्टेंबरला होणार आहे. तर भारत विरुद्ध विंडीज यांच्यातील कसोटी मालिकेला 2 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. बीसीसीआय सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, बुमराह आशिया कप स्पर्धेत खेळल्यास तो विंडीज विरुद्ध कसोटी मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही. “बुमराह आशिया कप स्पर्धेत खेळला आणि भारतीय संघ अंतिम फेरीत पोहचली तर तो हा सामना आणि कसोटी मालिकेपैकी कशाला प्राधान्य देणार? हा प्रश्न उपस्थित केला जाईल”, असं सूत्राने म्हटलं.
सूत्राने काय म्हटलं?“बुमराह आशिया कप स्पर्धेत खेळल्यास त्याला 1 महिन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते. बुमराह त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसू शकतो. याबाबतचा निर्णय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि हेड कोच गौतम गंभीर घेतील. हा निर्णय फार महत्त्वाचा ठरणार आहे. कारण बुमराहचा टेस्ट क्रिकेट आवडता फॉर्मेट आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीत पॉइंट्स मिळवणंही संघासाठी महत्त्वाचं आहे. त्यासाठी संघात बुमराह असणं महत्त्वाचं आहे. तसेच बुमराह नववर्षात न्यूझीलंड विरुद्ध टी 20i मालिका खेळू शकतो”
बुमराहची इंग्लंड दौऱ्यातील कामगिरीबुमराह इंग्लंड दौऱ्यात वर्कलोड मॅनजमेंटमुळे कसोटी मालिकेत 5 पैकी फक्त 3 सामनेच खेळला. बुमराहने या 3 सामन्यांमध्ये 26 च्या सरासरीने एकूण 14 विकेट्स घेतल्या. त्यानंतर आता बुमराह आशिया कप स्पर्धेत खेळणार की नाही? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.