पुणे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरात समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत नळजोडाला मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र नागरिकांकडून त्यास विरोध दर्शविला जात आहे. त्यामुळे महापालिकेने आता पाणी मीटर बसविण्यास विरोध होत असल्याचे प्रकार घडल्यास संबंधितांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्याची कडक भूमिका घेतली आहे. मीटर बसविण्यामुळे पाणी गळती नियंत्रणात आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.
पुणे महापालिका प्रशासनाकडून पाण्याचा अतिरिक्त वापर होत असल्याचे सांगत पाणी गळतीवर व पाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडण्याचे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महापालिका प्रशासनास दिले होते. त्यानंतर आता महापालिका प्रशासनाने पाणी गळती रोखण्यासाठी ठोस भूमिका घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार, पाणी गळती रोखण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्येच आता नळजोडाला मीटर बसविण्याचे काम प्राधान्याने केल्यास पाणी वापरावर नियंत्रण येणार आहे. त्यामुळे महापालिकेने पाणी मीटर बसविण्यासाठी कडक भूमिका घेतली आहे.
...तर पाणी कपात करणे अपरिहार्य
महापालिकेकडून पुढील एक महिन्यात शहरातील उर्वरित नळजोडांना पाणी मीटर बसविण्यात येणार आहेत. पाणी मीटर बसविण्यास नागरिकांचा विरोध होत आहे. सर्व मीटर बसविल्यास गळती शोधून पाणी वापर कमी करणे शक्य होणार आहे. त्यासाठी मीटर बसविण्याची गरज आहे. अन्यथा संपूर्ण शहरात पाणी कपात करणे अपरिहार्य होणार आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी पत्रकात नमूद केले आहे.
मीटर बसविण्यास विरोध करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर पाणी नळजोड तोडणे किंवा सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी (कलम ३५३) गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही चंद्रन यांनी दिला आहे.