भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वात इंग्लंडमध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. कर्णधार म्हणून त्याच्या नेतृत्वातील हा पहिलाच दौरा हौता. या दौऱ्यात त्याने 754 धावांची जबरदस्त खेळी केली. त्याच्या या कामगिरीसाठी मालिकावीराच्या पुरस्काराने त्याला गौरविण्यात आले. इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम याने शुबमन गिलच्या नावाची निवड केली होती. शुबमन गिलने या मालिकेत केलेल्या कामगिरीसाठी एक विशेष पदक देण्यात आलं.गिलने प्लेअर ऑफ द सिरीज पदकासह एक फोटो काढला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा सेल्फी त्याने एका उंच इमारतीवर काढला आहे. गिलला मिळालेल्या पदकाच्या एका बाजूला Rothesay Test Series लिहिलं आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंड विरुद्ध भारत प्लेयर ऑफ सिरीज असं लिहिलं आहे.
शुबमन गिलला कसोटी मालिकेत पदकाव्यतिरिक्त प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड देखील दिला आहे. शुबमन गिलने एजबेस्टन कसोटीत टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. यात त्याने 269 आणि 161 धावांची खेळी केली होती. या डावानंतर त्याला एक दारूची बाटली देण्यात आली होती. प्लेयर ऑफ द सीरिज अवॉर्ड मिळाल्यानंतरही त्याला दारूची आणखी एक बाटली देण्यात आली. इंग्लंडमध्ये प्लेयर ऑफ द मॅच आणि प्लेयर ऑफ द सीरिजसाठी दारूची बाटली दिली जाते. दरम्यान, मोहम्मद सिराजलाही शेवटच्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळाला. पण त्याने फक्त पदक घेतलं आणि दारूची बाटली घेण्यास नकार दिला.
शुबमन गिलने त्याच्या बॅटींग शैलीत बराच बदल केला आहे. मागच्या काही वर्षात त्याच्या फलंदाजीत अनेक त्रुटी दिसून आल्या होत्या. त्यात त्याच्याकडे नेतृत्व सोपवल्याने आश्चर्य व्यक्त होत होतं. पण शुबमन गिलने त्याच्या फलंदाजीच्या शैलीत तांत्रिक बदल केले. आयपीएल स्पर्धेदरम्यान त्याने आपली कमकुवत बाजू भक्कम केली. तसेच इंग्लंडमध्ये इंग्रजांना दिवसा तारे दाखवले.
भारतीय कर्णधार शुबमन गिलने या मालिकेत 754धावा केल्या आहेत. यासह त्याने इंग्लंडचा माजी कर्णधार ग्राहम गूचचा विक्रम मोडला आहे. गिल भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम गूच यांच्या नावावर होता. त्यांनी 1990 मध्ये 752 धावा केल्या होत्या.