Uddhav Thackeray And Raj Thackeray : गेल्या बऱ्याच दिवसांपासून राज्यात मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) या दोन्ही पक्षांत युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत. लवकरच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युती नावारुपाला येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे या दोन्ही नेत्यांनी प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे या युतीचे संकेत दिलेले आहेत. त्यामुळे लवकरच हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या युतीबाबत मोठं आणि महत्त्वाचं भाष्य केलं आहे. या युतीच्या निर्णय प्रक्रियेबाबत त्यांनी माहिती दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी मनसेसोबतच्या युतीवर भाष्य केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुंबई आणि एमएमआरएच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. या बैठकीत त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. याच सूचनांवर बोलताना त्यांनी मनसेसोबतच्या युतीवर महत्त्वाचे भाष्य केले आहे. मनसेसोबतच्या युतीवरचा निर्णय पक्ष घेईल तुम्ही सर्वच जागांसाठी तयारीला लागा, असा आदेश उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी वैयक्तिक मार्गदर्शन केले आहे. ठाकरेंनी या बैठकीत ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, वसई-विरार या सात पालिकांच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा ठाकरेंनी घेतला. जिथे-जिथे गटप्रमुखांच्या नेमणुका झाल्या नाहीत, तिथे गटप्रमुखांच्या नेमणुका करा, अशा सूचनाही यावेळी उद्धव ठाकरेंनी यावेळी केल्या. संघटनात्मक तयारी पालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीकोनातूनच करा. कोर्टाच्या निर्णयानुसार नव्या प्रभाग रचनेनुसार ज्या निवडणुका होणार आहेत. त्याकडे विशेष लक्ष ठेवा. ज्या गोष्टी घडत आहेत, त्याकडेही काळजीपूर्वक लक्ष ठेवा, असेही उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत सांगितले आहे.
दरम्यान, आता उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या युतीवर केलेल्या भाष्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. मनसे आणि ठाकरे गटात युती झालीच तर त्या युतीचे स्वरुप कसे असेल, असा प्रश्न आता विचारला जात आहे.