मंचर : मंचर शहरात भरचौकात धारदार शस्त्राने एकाचा खून करण्यात आला. ही घटना शनिवारी (ता. २) रात्री दहाच्या सुमारास मंचर शहरात घडली. प्रशांत रवींद्र गांजाळे (वय ४५, रा. मंचर) असे खून करण्यात आलेल्याचे आहे. घटनेनंतर पसार झालेल्या तीनही आरोपींना एका तासाच्या आत पोलिसांनी जेरबंद केले.
शहाजी वामन इंदोरे, सचिन सुदाम इंदोरे, प्रतीक शिवाजी इंदोरे (सर्व रा. चांडोली खुर्द, ता. आंबेगाव) या तिघांशी गांजाळे यांचा वाद झाला होता. या वेळी आरोपी शहाजी याने धारदार शस्त्राने गांजाळे यांच्या गळ्यावर वार केल्याने ते जागीच कोसळले. त्यांना तत्काळ मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दरम्यान, घोडेगाव न्यायालयाने तीनही आरोपींना शुक्रवारपर्यंत (ता. ८) पोलिस कोठडी सुनावली. आर्थिक व्यवहारातून खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
घटनेनंतर मंचर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी घाबरून दुकानांची शटर खाली केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर, पोलिस उपनिरीक्षक सुनील धनवे, यशवंत यादव यांच्या पथकाने आरोपींना अटक केली.