शादी का लड्डू.. जो खाए वो पछताए, जो ना खाए वो ललचाए.. अशी एक म्हण आहे. राजस्थानमधील जोधपूरमध्ये एका तरुणाने त्याच मोहात, 1-2 नव्हे तब्बल 4 वेळा लग्न केलं पण त्याला एकदाही त्याला वधू काही मिळाली नाही. ही घटना जोधपूर जिल्ह्यातील लुनी पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथे एका तरुणाला त्याच्या शेजाऱ्यांनी फसवले. विजेंद्र नावाच्या तरुणाचे लग्न होत नव्हते. संधी पाहून शेजाऱ्यांनी त्याला मदत करण्याची तयारी दाखवली. शेजाऱ्यांनी सांगितले की जर त्याने त्यांना काही पैसे दिले तर ते त्याचे लग्न करून देतील. त्यांच्या बोलण्याने विजेंद्रला खात्री पटली. पण त्याला हे माहित नव्हतं की चार वेळा लग्न करूनही त्याला वधू मिळणार नाही, मधुचंद्र चर दूरच राहिला. आता याप्रकरणी त्याने पोलिसांत जाऊन न्यायाची मागणी केली आहे.
विजेंद्र एकाकीपणाचा बळी होता. त्याने त्याच्या शेजाऱ्यांवर विश्वास ठेवला. शेजाऱ्यांनी त्याचे लग्न चार वेळा ठरवले, पण एकही वधू त्याच्यासोबत घरी काही आली नाही. जेव्हा त्या तरुणाने पहिल्यांदा लग्न झालं तेव्हा मंडप सजवण्यात आला आणि लग्नाची मिरवणूक मोठ्या थाटामाटात निघाली. वधू बसमधून उतरली, पण नंतर ती पुन्हा त्याच बसमध्ये चढली आणि गायब झाली. तरुणाच्या शेजाऱ्यांनी त्याला धीर दिला आणि सांगितले की ते पुढच्या वेळी एक चांगली मुलगी शोधतील असं म्हणत त्याची समजूत काढली..
मिळाला फक्त दिलासा
त्या तरुणाने शेजाऱ्यांचा सल्ला मानला. काही काळानंतर, त्या तरुणाच्या दुसऱ्या लग्नाची तयारी सुरू झाली. लग्नाची वरात आली, सप्तपदी, वरमाळा झाल्या आणि लग्न लागलं. पण पुन्हा तेच.. लग्नानंतर, वधू ट्रेनमध्ये चढली आणि पळून गेली. यावेळीही तरुणाची फसणूक झाली. पण तरीही त्याने हार मानली नाही, वर आता त्याच्या तिसऱ्या लग्नाची तयारी करू लागला. मंडप पुन्हा सजवण्यात आला. यावेळी त्याला खात्री होती की त्याला नक्कीच वधू मिळेल.
वधूच नाही, पंडितही पळाला
पण तेव्हा तर हद्दच झाली. त्या तरुणाच्या लग्नाच्या विधी सुरू झाल्या, पण वधू पळून गेली. एवढंच नव्हे तर लग्नाचे मंत्र म्हणणारा पुजारीही पळून गेला. हे सगळं पाहून बिचारा तो वर आणि इतर लोकंही डोक्याला हात लावून बसले. मात्र तरीही त्या तरुणाच्या शेजाऱ्यांनी त्याला चौथ्यांदा लग्नाचे स्वप्न दाखवले. त्या तरुणाला वाटले की यावेळी तरी सगळं काही ठीक होईल. अखेर चौथी वधू आली, त्या तरुणाचे थाटामाटात लग्नही झालं, पण निघताना माशी शिंकली. त्याच्या वधूने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला.
लग्नासाठी किती केला खर्च ?
अखेर त्या तरुणाला समजलं की त्याचे शेजारी, लग्न लावून देण्याच्या नावाखाली त्याची फसवणूक करत आहेत. या चार लग्नांमध्ये त्या तरुणाने एकूण 3 लाख 85 हजार रुपये खर्च केले, परंतु त्याचा एकटेपणा तसाच राहिला. त्यानंतर त्या तरुणाने त्याच्या चार शेजारी पप्पू भारती, अमर भारती, भंवरी देवी आणि राकेश भारती यांना त्याचे पैसे परत करण्यास सांगितले. सुरुवातीला शेजाऱ्यांनी त्या तरुणाला दोन महिन्यांनी पैसे परत करू असं सांगितलं.
मात्र, जेव्हा तो तरुण वारंवार त्याचे पैसे मागू लागला, तेव्हा शेजाऱ्यांनी त्याला खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली. अखेर त्या तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. त्याने त्याच्या चारही शेजाऱ्यांविरुद्ध लुनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आता हे प्रकरण पोलिसांच्या हाती आहे. तरुणाला आशा आहे की तिथे तरी त्याला न्याय मिळेल.