इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने या पराभवाची भरपाई कशी करणार ते आधीच सांगून टाकलं, म्हणाला…
GH News August 04, 2025 09:11 PM

पाचव्या कसोटी सामन्यात भारताची बाजू पडकी होती. स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह वर्कलोड मॅनेजमेंटमुळे या सामन्यात नव्हता. त्यामुळे शुबमन गिलचं टेन्शन वाढलं होतं. तसेच पहिल्या डावात इंग्लंडने 23 धावांची आघाडी घेतली. तर दुसऱ्या डावात इंग्लंडने 374 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली. तिसऱ्या विकेटसाठी जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी शतकं ठोकली आणि 195 धावांची मोठी भागीदारी केली. ही जोडी खेळेपर्यंत इंग्लंडला विजयासाठी फक्त 73 धावांची गरज होती. पण सामन्याचा रंग असा काही बदलला की इंग्लंडचे धडाधड विकेट पडले. 301 धावा असताना हॅरी ब्रूक 111 धावा करून बाद झाला. त्यानंतर जेकॉब बेथेल 5 धावा करून बाद झाला. जो रूट 105 धावा करून बाद झाला आणि इंग्लंडची 5 बाद 337 धावा अशी स्थिती झाली. त्यामुळे भारताच्या विजयाच्या अपेक्षा वाढू लागल्या. चौथ्या दिवसाचा खेळ संपणार तेव्हा जेमी स्मिथ 9 धावा करून बाद झाला. त्यामुळे पाचव्या दिवशी 4 विकेट आणि 35 धावा अशी स्थिती आली. भारताने शेवटचे चार विकेट अवघ्या 28 धावांवर काढले आणि हा सामना 6 धावांनी जिंकला.

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स सामन्यानंतर म्हणाला की, ‘निराश झालो कारण हा सामना गमावावा लागला. आता पुनर्वसन करण्याची आणि मोठ्या सामन्याची वाट पाहण्याची वेळ आली आहे.’ बेन स्टोक्सचा हा इशारा इंग्लंड ऑस्ट्रेलिया एशेज मालिकेकडे आहे. नोव्हेंबर महिन्यात इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत पाच सामने खेळणार आहे. दोन्ही संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी राहिले आहेत. ऑस्ट्रेलियन संघ सध्या फॉर्मात आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामना गमावल्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका 3-0 ने जिंकली.

दरम्यान पाचव्या सामन्याचं विश्लेषण करताना बेन स्टोक्स म्हणाला की, ‘जेव्हा तुमचा एक गोलंदाज खेळाच्या सुरुवातीलाच खाली पडतो तेव्हा इतर सर्वांची भूमिका बदलते. त्या दुसऱ्या डावात गोलंदाजांनी दाखवलेले हृदय आणि इच्छा जबरदस्त होती. आम्ही खेळाडूंकडून फक्त एवढेच मागतो की त्यांनी मैदानावर सर्वकाही झोकून द्यावे. तुमचा एक गोलंदाज खाली पडतो तेव्हा ते चांगलं नाही पण आमच्या तीन वेगवान गोलंदाजांचे चांगले प्रयत्न होते.’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.