सगळ्या नेत्यांना स्थान, पण धनंजय मुंडेंचा फोटो गायब, बीडमधील त्या बॅनरची राज्यभरात चर्चा!
GH News August 04, 2025 09:11 PM

Dhananjay Munde : गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे असलेले कृषीखाते मिळावे यासाठी मुंडे यांनी नुकतेच प्रयत्न केले होते. पण कृषिमंत्रिपदाची माळ दत्ता भरणे यांच्या गळ्यात पडली आणि क्रीडा खाते कोकाटे यांना देण्यात आले. मुंडे यांच्या कार्यकाळात कृषीखात्यात आर्थिक गैरव्यवहार झाला होता, असाही आरोप करण्यात आला. त्यातून मात्र ते निर्दोष सुटले. या सर्व घडामोडींमुळे बीड जिल्हा राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. असे असतानाच आता बॅनरमुळे बीडचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यातील बॅनरवर त्यांचाच फोटो गायब असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर अजित पवार यांचा फोटो आहे. त्यामुळेच इथे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

ठिकठिकाणी लावण्यात आले बॅनर्स

बीडमध्ये राष्ट्रवादी प्रवेशाच्या बॅनरवर धनंजय मुंडे यांचा फोटो नसल्याचे समोर आले आहे. भाजपाचे राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा 7 ऑगस्ट रोजी बीडच्या वडवनी येथे राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षात जाहीर प्रवेश होणार आहे. या कार्यक्रमाला अजित पवार हेदेखील उपस्थित राहणार आहेत. आमदार प्रकाश सोळंके यांच्या स्थानिक नेतृत्त्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याची जास्तीत जास्त लोकांना माहिती मिळावी यासाठी बीडमध्ये जागोजागी बॅनर्स लावण्यात आले आहेत. याच बॅनर्सवर धनंजय मुंडे यांचा फोटो नसल्याचे समोर आले आहे.

बॅनरवर नेमके काय आहे?

सध्या समोर आलेल्या काही बॅनर्सवर बाबरी मुंडे यांचे नाव दिसत आहे. सोबतच अजित पवार यांचेही नाव आहे. या बॅनरवर प्रकाश सोळंके, अजित पवार यांचेही मोठे-मोठे फोटो आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी पक्षातील अन्य वरिष्ठ नेत्यांचेही वर फोटो लावलेले दिसत आहेत. यात प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, रुपाली चाकणकर यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. मात्र या बॅनरवर धनंजय मुंडे यांचा फोटो मात्र कुठेही नाही.

गेल्या काही दिवसांत मुंडेंसोबत नेमकं काय घडलं?

ही बाब बीडच्या लोकांच्या नजरेतून सुटलेली नाही. हे बॅनर समोर आल्यानंतर बीडच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले. या आरोपांमुळे त्यांना आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला. मध्यंतरी त्यांची प्रकृतीही बिघडली होती. त्यानंतर काही दिवस ते सार्वजनिक कार्यक्रमांत दिसले नव्हते. या सर्व घडामोडींनंतर आता धनंजय मुंडे यांचा बॅनरवर फोटो दिसत नाहीये. याचा नेमका काय अर्थ काढावा? असा सवाल बीडमध्ये केला जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.