फक्त थंड पदार्थच नाहीत, 'ही' 6 कारणेही बनू शकतात घसादुखीचे कारण
Tv9 Marathi August 05, 2025 02:45 AM

घसा खवखवणे किंवा घसा दुखणे म्हणजे आपण लगेच थंड पदार्थ खाल्ले किंवा हवामानातील बदलामुळे असं झालंय असा विचार करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, यामागे काही छुपी कारणेही असू शकतात, ज्यांचा थेट संबंध थंड पदार्थांशी नसतो? जर तुम्हालाही सर्दी-खोकला नसतानाही वारंवार घसा खवखवण्याचा किंवा दुखण्याचा त्रास होत असेल, तर या 6 कारणांकडे दुर्लक्ष करू नका. ही कारणे तुम्हाला कदाचित माहीत नसतील, पण तुमच्या घशाच्या त्रासाचे मूळ त्यात असू शकते.

घसा खवखवण्याची 6 छुपी कारणे आणि त्यावर उपाय

धुळीची ऍलर्जी

घरातली धूळ, पाळीव प्राण्यांचे केस किंवा हवेतील इतर धुलीकणांमुळे काही लोकांना ऍलर्जी होते. यामुळे घशामध्ये सूज येऊ शकते आणि घसा खवखवू शकतो. हा त्रास अनेकदा ताप किंवा सर्दी-खोकल्याशिवायही होऊ शकतो.

उपाय: घर स्वच्छ ठेवा, पाळीव प्राण्यांना वेळोवेळी ब्रश करा आणि ऍलर्जी झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तोंडातून श्वास घेणे

जर तुमचं नाक बंद असेल किंवा तुम्हाला रात्री तोंडातून श्वास घेण्याची सवय असेल, तर त्यामुळे घसा कोरडा पडतो. सकाळी उठल्यावर घसा खवखवण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.

उपाय: रात्री झोपताना नाकावाटे श्वास घेण्याचा प्रयत्न करा. गरम पाण्याची वाफ घेतल्याने नाक मोकळं होण्यास मदत होते.

गॅस्ट्रिक समस्या

पोटात तयार होणारे ॲसिड जर घशापर्यंत परत आले, तर त्यामुळे घशात जळजळ होते आणि घसा खवखवतो. यालाच ऍसिड रिफ्लक्स (Acid Reflux) असंही म्हणतात.

उपाय: रात्री झोपण्यापूर्वी खूप वेळ आधी जेवा, जड आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा आणि जास्त पाणी प्या.

मोठ्याने बोलणे

शिक्षक, गायक किंवा जे लोक जास्त वेळ मोठ्याने बोलतात, त्यांच्या घशाच्या स्नायूंवर ताण येतो. यामुळे घसा दुखू शकतो किंवा खवखवू शकतो.

उपाय: मोठ्याने बोलण्याचे काम असल्यास मध्ये ब्रेक घ्या, कोमट पाणी प्या आणि घशाला आराम द्या.

धूम्रपान

धूम्रपान केल्याने किंवा दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या धुम्रपानाच्या संपर्कात आल्याने घशाच्या आतील त्वचेवर जळजळ होते. यामुळे घसा कोरडा पडतो आणि खवखवतो.

उपाय: धूम्रपान करणे टाळा.

बॅक्टेरियल इन्फेक्शन

कधीकधी ताप नसतानाही घशामध्ये बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं. यामुळे घशामध्ये सूज, दुखणे किंवा खवखव जाणवते.

उपाय: घसा खवखवत असल्यास गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या करा. पण जर त्रास जास्त वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.