पालीत बुद्धिबळ स्पर्धेला चांगला प्रतिसाद
esakal August 05, 2025 04:45 AM

पालीत बुद्धिबळ स्पर्धेला चांगला प्रतिसाद
राज पेढवीसह राज अधिकारी यांचा विविध गटांत विजय
पाली, ता. ४ (वार्ताहर) ः पाली येथील महाकाली मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. भाजप पाली शहरतर्फे भाजप महाराष्ट्र प्रदेश सदस्य राजेश मपारा यांच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा घेण्यात आली. विविध वयोगटांतील बुद्धिबळप्रेमींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत स्पर्धेला रंगत आणली. स्पर्धेतील १५ वर्षे वयोगटात राज रवींद्र पेढवी याने शानदार खेळ करीत प्रथम क्रमांक पटकावला. याच गटात अभय विजय शिंदे याला द्वितीय क्रमांक, सक्षम गणेश भोईर याला तृतीय क्रमांक आणि श्रेयस सचिन गोळे याला चतुर्थ क्रमांक प्राप्त झाला. या युवा गटातील खेळाडूंनी परिपक्व खेळाचे दर्शन घडवत प्रेक्षकांची मने जिंकली.
खुल्या गटातदेखील जबरदस्त चुरस पाहायला मिळाली. या गटात राज अधिकारी याने अत्यंत अचूक आणि संयमी खेळ करीत पहिला क्रमांक पटकवला. रवींद्र पेडवी याला द्वितीय, रोहित साजेकर याला तृतीय आणि यश मेहता याला चतुर्थ क्रमांक प्राप्त झाला. विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्रं देण्यात आली, तर सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह व सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी लहानग्यापासून ज्येष्ठापर्यंत अनेकांनी स्पर्धेत सहभागी होऊन बुद्धिबळ खेळण्याचा आनंद घेतला. विशेष म्हणजे स्पर्धेचे संपूर्ण आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. कार्यक्रमाचे संयोजन भाजप पाली शहर अध्यक्ष सुशील शिंदे, नगरसेवक पराग मेहता, महिला अध्यक्षा प्रणाली शेठ, संजोग शेठ, विराज पानकर, रवींद्र पेडवी आणि इतर कार्यकर्त्यांनी केले होते. कार्यक्रमास भाजप प्रदेश सदस्य राजेश मेहता, नेते प्रकाश देसाई, पाली प्रभारी नगराध्यक्ष आरिफ मणियार, उपजिल्हा अध्यक्ष आलाप मेहता, नगरसेवक सुधाकर मोरे, परेश वडके, ॲड. सुभाष पाटील, रोहन दगडे तसेच ज्येष्ठ बुद्धिबळपटू दादा वैद्य आणि सुरेश चांदोरकर यांची उपस्थिती लाभली.
............

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.