आरबीआय रेपो दर: देशभरातील गृहकर्ज आणि वाहन कर्जधारकांच्यादृष्टीने महत्त्वाचे मानले जाणारे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरणाची बुधवारी घोषणा करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि संचालकांची बैठक सुरु होती. या बैठकीअंती रिझर्व्ह बँकेने सध्याच्या रेपो दरात (Repo Rate) कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेपो रेट 5.5 टक्के कायम राहणार आहे. रिझर्व्ह बँकेने सलग गेल्या दोन पतधोरणांमध्ये रेपो रेटमध्ये कपात केली होती. त्यामुळे आताच्या पतधोरणातही रेपो रेट आणखी कमी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, रिझर्व्ह बँकेने रेपो (RBI) रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केल्यानंतर देशभरातील बँकांनी त्यांच्या गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे व्याजदर घटवले होते. त्याचा सर्वसामान्यांना कितपत फायदा झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही. याशिवाय, अलीकडच्या काळातील महागाई दर रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षेपेक्षा कमी राहिला आहे. त्यामुळे रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले. रिझव्ह बॅकेने रेपो रेट जैसे थे ठेवल्याने गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या व्याजदरात आणि हप्त्यात कोणताही बदल होणार नाही. यापूर्वी जून महिन्यात रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची कपात केली होती. त्यामुळे रेपो रेट सहा टक्क्यांवरुन 5.50 टक्क्यांपर्यंत खाली आला होता.
आणखी वाचा