'एनडीए'च्या माध्यमातून राष्ट्ररक्षणाची संधी
esakal August 06, 2025 01:45 PM

- रिना भुतडा, करिअर समुपदेशक

युवकांना राष्ट्रसेवेची संधी देण्यासाठी स्थापन झालेली राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) ही भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलासाठी संयुक्त प्रशिक्षण देणारी जागतिक दर्जाची संस्था पुणे येथील खडकवासला येथे आहे. देशसेवेसाठी अधिकारी बनण्याचा हा मार्ग रोमांचक, शिस्तबद्ध आणि अत्यंत गौरवाचा आहे.

पात्रता व शैक्षणिक निकष

  • उमेदवार भारताचा नागरिक असावा.

  • वय साडेसोळा ते एकोणीस वर्षांदरम्यान असावे.

  • बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे.

  • वायूदल व नौदलासाठी गणित व भौतिकशास्त्र विषय आवश्यकच आहेत.

  • उमेदवार शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा. कारण ‘एनडीए’त प्रवेशासाठी कठोर वैद्यकीय निकषही पूर्ण करावे लागतात.

  • पूर्वी ही परीक्षा केवळ मुलांसाठी होती, मात्र आता मुलींनाही सहभागी होता येते, हे विशेष उल्लेखनीय आहे.

प्रवेश प्रक्रिया

‘एनडीए’मध्ये प्रवेशासाठी ‘यूपीएससी’ दरवर्षी दोन वेळा परीक्षा घेते. दरवर्षी सुमारे ५ लाख विद्यार्थी नोंदणी करतात, त्यापैकी फक्त ४०० विद्यार्थ्यांची निवड होते. यामध्ये १९ जागा मुलींसाठी राखीव असतात. प्रवेश तीन टप्प्यात होतो – लेखी परीक्षा, एसएसबी मुलाखत व वैद्यकीय तपासणी.

लेखी परीक्षा ९०० गुणांची असून दोन पेपर असतात – गणित (३०० गुण, १२० प्रश्न) व सामान्य क्षमता चाचणी (GAT – ६०० गुण, १५० प्रश्न). प्रत्येकी २.५ तास वेळ असतो व चुकीच्या उत्तरांना निगेटिव्ह मार्क्स मिळतात. लेखी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना ५ दिवसांच्या एसएसबी मुलाखतीसाठी बोलावले जाते (९०० गुण). यात मानसशास्त्रीय चाचण्या, ग्रुप ॲक्टिव्हिटी, वैयक्तिक मुलाखत व अंतिम कॉन्फरन्स असते.

मुलाखतीनंतर निवड झालेल्यांची वैद्यकीय तपासणी होते. लेखी व एसएसबी मिळून एकूण १८०० गुणांवर गुणवत्ता यादी तयार होते. सर्वोत्तम गुण व वैद्यकीयदृष्ट्या फिट उमेदवारांना लष्कर, नौदल किंवा वायुदलात प्रवेश दिला जातो.

आवश्यक कौशल्ये

‘एनडीए’मध्ये यशस्वी होण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्थैर्य, जलद निर्णयक्षमता, आत्मविश्वास, संघभावना, आणि नेतृत्वगुण आवश्यक असतात. त्याचबरोबर गणित व तर्कशक्तीचे ज्ञान, संवादकौशल्य, देशभक्ती व जबाबदारीची जाणीव या गोष्टीदेखील महत्त्वाच्या आहेत. संकटाशी सामना करण्याची ‘मानसिक तयारी’ असणं हा ‘एनडीए’ उमेदवाराचा मुख्य गुणधर्म आहे.

करिअर संधी व भविष्य

‘एनडीए’त यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवाराला भारतीय लष्कर, नौदल किंवा वायुदलाच्या अधिकारी पदावर नेमण्यात येते. त्यानंतर संबंधित शाखेत पुढील व्यावसायिक प्रशिक्षण घेतले जाते. उमेदवाराला पदवीसुद्धा मिळते, जी वायूदल व नौदलासाठी विज्ञान शाखेत असते.

‘एनडीए’ अधिकाऱ्यांना भविष्यात वरिष्ठ पदांवर जाण्याची संधी असते – जसे की ब्रिगेडियर, जनरल, एअर मार्शल, अॅडमिरल इत्यादी. सेवानिवृत्तीनंतरही अनेक अधिकारी प्रशासकीय, राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपली छाप पाडतात.

निष्कर्ष

‘एनडीए’ केवळ शैक्षणिक संस्था नसून, जीवनशैली घडवणारे प्रशिक्षण केंद्र आहे. येथे प्रवेश घेणे म्हणजे देशसेवेसाठी आपले जीवन समर्पित करणे. ज्यांच्यामध्ये शिस्त, धैर्य, नेतृत्व व राष्ट्रप्रेम आहे, त्यांच्यासाठी ‘एनडीए’ हा सर्वोत्तम मार्ग आहे. तुमच्यात देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द असेल, तर ‘एनडीए’ ही संधी तुमच्यासाठी सुवर्णद्वार ठरू शकते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.