- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक
रिचर्ड बाख या अमेरिकन लेखकाची ‘जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल’ नावाची कादंबरी स्वरूपातील एक रूपकात्मक आणि प्रेरणादायी कथा आहे. एका समुद्र पक्षाची ही कहाणी आहे. इतर समुद्र पक्षी, फक्त खाद्य शोधण्यासाठीच उडतात. परंतु जोनाथनला वेगळेच वेड असते. एक अंतःप्रेरणा, ऊर्मी असते. ‘मला एका उंचीवर जायचंय!
माझी नक्की कुणीतरी तिथे वाट बघतेय. मला काहीतरी तरी त्या, दूर पार वेगळं खुणावतंय.’ त्याचे नातलग त्याची खिल्ली उडवायचे. ‘अरे हे आपले काम नाही, आपला जन्म एका मर्यादेतच उडण्यासाठी झालाय.’ या वेडापायी त्याला हद्दपार केले जाते.
परंतु जोनाथनला उंचीचे वेड लागले होते तो रोज सराव करायचा. कधी त्याची दमछाक व्हायची. परंतु तो अगदी इंचाइंचाने आपल्या ध्येयाकडे कूच करायचा. नवनवीन तंत्र अवगत करायचा. एक दिवस तो ती स्वर्गीय उंची गाठतोच. त्याच्याआधी तिथे पोहोचलेले, त्याचे पुर्वासूरी त्याची वाटच बघत होते. ते त्याचा सत्कार करतात.
‘तू आत्ताशी एक पल्ला गाठलाय. तुला अजून पुढे जायचंय. काळाच्या पटलावर तुला सुवर्णाक्षरानं नाव कोरायचं आहे. या यशावर थांबलास तर संपलास. स्थलांतराशिवाय स्थित्यंतर नाही. आम्ही इथपर्यंत आलोच होतो की. तुला तुझे नवे गगन गाठायचे आहे. नव्हे तयार करायचे आहे.’
आणि जोनाथन नव्या उमेदीने, नवे वेगळे क्षितिज गाठायला सज्ज होतो.
थांबला तो संपला, असे म्हणतातच ना. शैक्षणिक यश मिळवण्यासाठी पण हीच मानसिकता उपयोगी पडते.
चरन् वै मधु विन्दति चरन् स्वादुमुदुम्बरम्।
सूर्यस्य पश्य श्रियमं यो न तन्द्रयते चरन्।
चरैवेति चरैवेति।
अर्थ - मध आणि मधुर फळे मिळवण्यासाठी माणसाला सतत फिरणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे जीवनात यश मिळवण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. सूर्याचे उदाहरण देऊन आपल्याला सतत सक्रिय आणि उत्साही राहण्याची प्रेरणा दिली आहे. आदर्श, ज्ञानी, विद्यार्थिप्रिय शिक्षक आहेत.
निवृत्त त्यांच्या काही माजी विद्यार्थ्यांनी त्यांना एक आदर्श शाळा निर्माण करण्याची गळ घातली. तुम्ही फक्त आम्हाला मार्गदर्शन करत राहा. शाळेसाठी आदर्श आचारसंहिता, काही नियम घालून द्या. एक छान आदर्श परंपरेची वाट निर्माण करून द्या.
‘मी ४० वर्षे खडू हातात धरलाय, आता एकदा खाली टाकला तो टाकला.’ असे बाणेदार उत्तर त्यांनी त्या माजी विद्यार्थ्यांना दिले आणि त्यांचा हिरमोड केला. कोणत्याही दुसऱ्या सकारात्मक, कल्पक पर्यायाची त्यांनी साधी चाचपणीही केली नाही. कोण जाणे त्या एका छोट्या तालुका पातळीवरील गावातील विद्यार्थी कदाचित आदर्श शिक्षणव्यवस्थेला मुकलेही असतील.
बदलत्या शिक्षण व्यवस्थेने मनाच्या मशागतीवर काहीतरी वेगळे आणि सकारात्मक प्रशिक्षण अगदी सुरवातीच्या इयत्तांपासून दिले पाहिजे. ज्या बुद्धीच्या जोरावर यशाची आस्माने गाठायची आहेत, तोच मन नावाचा अवयव आपल्याकडे जरा दुर्लक्षिला जातो की काय? असा प्रामाणिक प्रश्न मला पडतोय, एव्हढे मात्र नक्की.