कबुतरखाना वाचवण्यासाठी सर्वधर्मीयांचा दादरमध्ये एल्गार, प्रार्थना सभेचं आयोजन, विविध धर्मांचे धर्मगुरु सहभागी होणार
Tv9 Marathi August 06, 2025 01:45 PM

गेल्या काही दिवसांपासून कबुतरखान्यावरुन वाद सुरु आहे. त्यातच आता दादरमधील ऐतिहासिक कबुतरखान्याला वाचवण्यासाठी आज सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी १० वाजता ही सभा सुरू होईल. ज्यात विविध धर्मांचे धर्मगुरू आणि अनुयायी सहभागी होणार आहेत. कबुतरांना आणि कबुतरखान्याला वाचवण्यासाठी या सभेत सामूहिक प्रार्थना केली जाईल.

या कबुतरखान्याची जागा वाचवण्यासाठी नागरिकांकडून बराच काळ प्रयत्न सुरू आहेत. कबुतरं ही शांततेचं प्रतीक असून, या जागेमुळे दादरच्या सौंदर्यात भर पडते, असं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे हा कबुतरखाना तोडून टाकू नये, अशी मागणी जोर धरत आहे. आजच्या प्रार्थना सभेत जैन धर्मगुरुंसह अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. या सभेद्वारे कबुतरखान्याच्या संरक्षणाची मागणी शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल.

दादरमधील ऐतिहासिक कबुतरखाना वाचवण्यासाठी नागरिकांचा संघर्ष आणि जैन समाजाच्या विरोधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर तोडगा काढण्यासाठी तातडीने बैठक घेतली. कबुतरांमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवरून उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने कबुतरखाना पाडण्याची तयारी केली होती, ज्यामुळे हा वाद सुरू झाला. या कारवाईला विरोध करण्यासाठी जैन समाजाने ‘शांतिदूत यात्रा’ काढली होती. यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्देश दिले.

या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले की, कबुतरांचे जीव वाचवणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कबुतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही, असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी यासंदर्भात माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्याशीही चर्चा केल्याचे सांगितले.

कोणालाही कोणताही त्रास होणार नाही

या बैठकीनंतर मंगलप्रभात लोढा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कबुतरखाने अचानक बंद करू नयेत यासाठी आता उच्च न्यायालयात सरकार प्रतिनिधित्व करणार आहे. लवकरच एक समिती गठीत केली जाईल. ज्या कबुतरखान्यांवर ताडपत्री टाकून ते बंद करण्यात आले होते, त्या आता काढल्या जातील. तसेच, कबुतरांच्या विष्ठेची स्वच्छता करण्यासाठी ‘टाटा’ने तयार केलेल्या नवीन मशीनचा वापर केला जाणार आहे, जेणेकरून कोणालाही कोणताही त्रास होणार नाही, अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

कबुतरखाने सुरू झाल्यावर कबुतरांना नियंत्रित स्वरूपातच खाद्य दिले जाईल, जेणेकरून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. एकंदरीत, मुख्यमंत्र्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे कबुतरप्रेमींना मोठा दिलासा मिळाला असून, लवकरच यावर समाधानकारक तोडगा काढला जाईल, असे म्हटले जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.