पामबीच मार्गावरील तुटलेली बॅरिकेट्स धोकादायक
तुर्भे, ता.६ (बातमीदार) : नवी मुंबईतील क्वीन नेकलेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पामबीच मार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. या मार्गावरील वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अनेक वेळा अपघातांची नोंद झाली आहे. मात्र, या अपघातांमुळे रस्त्यावर लावलेली सुरक्षेसाठीची बॅरिकेट्स तुटून पडल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येते. या बॅरिकेट्समुळे वाहनचालकांना अधिक धोका निर्माण झाला आहे.
तुटलेल्या बॅरिकेट्समुळे रस्त्याकडेने असलेले तलाव, नाल्यांचे भाग व मोठे खड्डे उघड्या अवस्थेत आहेत. बॅरिकेट्स नसल्यामुळे जर एखादी गाडी नियंत्रणाबाहेर गेली, तर ती थेट या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. प्रशासनाने हे बॅरिकेट्स दुरुस्त न केल्यास भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, नवी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या भागातील बॅरिकेट्सची पाहणी करून तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. पामबीच मार्गांवरील तलाव भागात बॅरिकेट्स नसल्याने जीव धोक्यात येऊ शकतो. याबाबत शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्याशी संपर्क साधला पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.