स्कायवॉकवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण
बेशिस्त नागरिकांनी थुंकून रंगवल्या भिंती
संतोष दिवाडकर : सकाळ वृत्तसेवा
कल्याण, ता. ६ : रेल्वे स्थानकाला दोन्ही बाजूंनी जोडणाऱ्या दोन्ही स्कायवॉकची सध्या अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. पश्चिमेचा स्कायवॉक अनेक ठिकाणी मोडकळीस आला असून, त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. तर पूर्वेला जोडणाऱ्या स्कायवॉकच्या दुतर्फा घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बेशिस्त नागरिक पान, गुटखा खाऊन थुंकल्याने सुरक्षा रेलिंगसह भिंती लालेलाल झालेल्या आहेत. याबाबत प्रवाशांनी रेल्वे व महापालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.
सिद्धार्थनगरकडून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या स्कायवॉकवर स्वच्छता केली जाते; मात्र स्कायवॉकच्या दुतर्फा असलेल्या कोपऱ्यात प्रचंड अस्वच्छता दिसून येते. त्यामुळे प्रवासी स्कायवॉकच्या मध्य भागातून चालणेच पसंत करतात. काही बेशिस्त लोक पान, गुटख्यासारखे पदार्थ खाऊन येता-जाता कडेला थुंकतात. हे कोपरे स्वच्छ केले जात नसल्याने थरावर थर चढत आहेत. त्यामुळे पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे इतर प्रवाशांना नाक मुठीत धरून चालावे लागत आहे. या घाणीमुळे स्थानिक नागरिक, ज्येष्ठ, दिव्यांग, महिला आणि विद्यार्थ्यांना प्रवास करताना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. रेलिंगची अवस्था इतकी भयावह आहे, की त्याचा आधार घेऊन चालणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना इतर व्यक्तींचा आधार घ्यावा लागतो. थुंकीमुळे अनेक आजार व रोगराई पसरते. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांना यासाठी जबाबदार न धरता थुंकणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
पश्चिमेकडील बाजूस स्मार्ट सिटीअंतर्गत कामे सुरू आहेत. असे असले तरी सध्याच्या स्कायवॉकची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. हा स्कायवॉक सध्या अतिशय दयनीय अवस्थेत आहे. काही ठिकाणी तुटलेल्या लाद्या, फाटलेले छप्पर तसेच धोकादायक सुरक्षा रेलिंगमुळे स्कायवॉकवरून प्रवास करणे प्रवाशांसाठी धोकादायक ठरते आहे. त्याचबरोबर या स्कायवॉकवर मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांचे वारंवार अतिक्रमण होत असल्याने प्रवाशांना चालण्यासाठी जागा अपुरी पडते. अनेकदा हे फेरीवाले प्रवाशांशी हुज्जत घालत दादागिरीही करतात. बरेचदा बनावट वस्तू विकून ग्राहकांचीदेखील फसवणूक केली जाते. मात्र यांच्यावर रेल्वे सुरक्षा दल तसेच महापालिका फेरीवाला पथकाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
स्कायवॉकची दुरुस्ती करीत सुरक्षा रक्षक व सीसीटीव्ही बसवावेत. बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून पान, गुटखा थुंकण्यास आळा घालावा. तसेच फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर कठोर व सातत्याने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
भटक्या श्वानांची भीती
रेल्वेस्थानकातून सिद्धार्थनगर व कोळसेवाडीकडे जाण्यासाठी लांबलचक स्कायवॉक आहे. या स्कायवॉकवर रात्रीच्या वेळी गर्दुल्ले तसेच बेघर आढळून येतात. त्यामुळे येथून रात्री-अपरात्री एकटे जाताना महिलांना असुरक्षित वाटते. त्याचबरोबर अलीकडे मोठ्या प्रमाणावर भटके श्वानही स्कायवॉकवर पावसापासून बचाव करण्यासाठी निवारा बनवून थांबले आहेत. त्यांच्याकडून कसलाही उपद्रव होत नसला तरी त्यांच्या विष्ठेमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.