मीरा रोड केम चो बार रेड मीरा रोड: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच्या काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या ‘केम छो’ या ऑर्केस्ट्रा बारमधील (Mira Road Kem Cho Bar Raid) अनैतिक कारवायांचे भयानक वास्तव बुधवारी एबीपी माझा ने उघडकीस आणले. या बातमीची दखल घेत पोलीस आणि पालिका प्रशासनाने तत्काळ कारवाई करत त्या बारमधील गुप्त दरवाजा, अरुंद बोळ आणि ‘कॅविटी रूम’ बुधवारीच उद्ध्वस्त केलं.
विशेष बाब म्हणजे, अनैतिक मानवी वाहतूक कक्ष (भाईंदर विभाग) चे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे यांनी या बारवर सोमवारी कारवाई करून, पोलीस येताच वर्दी देणारा ‘अलार्म सिग्नल’, बारच्या मागील बाजूस असलेली गुप्त पळवाट आणि अन्य संशयास्पद ठिकाणांचा पर्दाफाश केला होता. परंतु, ही महत्त्वपूर्ण आणि धाडसी कारवाई करणाऱ्या देविदास हंडोरे यांची बुधवारीच तात्काळ बदली करण्यात आली, ही बाब आश्चर्यजनक ठरत आहे. बारवर कारवाई करतानाचे छायाचित्र एबीपी माझाला मिळाल्यामुळेच ही बदली झाली, अशी चर्चा पोलीस दलात सुरू असून, त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
‘केम छो’ बार काशिमीरा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असून, स्थानिक पोलीस ठाण्यानेच ही कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही, हे स्पष्ट आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्थानिक पोलीस ठाण्यातील कुठल्याही जबाबदार अधिकाऱ्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई झालेली नाही. नुकतेच पदभार स्वीकारलेले मीरा-भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या कार्यशैलीवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्याने बारवर यशस्वीपणे कारवाई केली, त्याची बदली; आणि जे निष्क्रीय राहिले, त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही, या दुटप्पी धोरणामुळे पोलीस दलातील कार्यप्रणाली आणि नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
मिरा भाईदरमध्ये 30 ते 35 बार आहेत. या बारना रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी आहे. पण बार चालू असतात ते चार वाजेपर्यंत. या सर्व बारमध्ये प्रत्यक्षात गाणं म्हटलं जात नाही. बारबालांना ‘सिंगर’ म्हणून दाखवलं जातं, पण प्रत्यक्षात वाजणारं गाणं असतं रेकॉर्डेड, आणि त्या फक्त ओठ हलवत असतात. रात्रीच्या सुमारास महिला आणि पुरुष मिळून फक्त 8 सिंगर ठेवण्याची परवानगी असते. मात्र या ठिकाणी 20 ते 25 बारबाला असतात.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
मीरा रोडच्या ‘केम छो’ ऑर्केस्ट्रा बारचं भयानक वास्तव, अलार्मचा इशारा आणि गुप्त पळवाट
आणखी वाचा