पेण रेल्वे स्थानकाजवळील बोगद्यात मोठे खड्डे
वाहनचालकांची कसरत; अपघाताची शक्यता
पेण, ता. ६ (वार्ताहर) ः मुंबई-गोवा महामार्गावर पेण रेल्वे स्थानकाजवळील बोगद्यात मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून, या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना प्रचंड अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी वाहनांची कसरत सुरू असून, कधीही गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
गेल्या सतरा-आठरा वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र अजूनही या महामार्गाचे अनेक टप्पे अर्धवट अवस्थेतच आहेत. केंद्र आणि राज्य सरकारतर्फे वेळोवेळी पूर्णत्वाच्या तारीखा जाहीर करण्यात येतात, मात्र प्रत्यक्षात कामाचे संथ गतीने होणे आणि अर्धवट रस्ते हीच वस्तुस्थिती आहे. परिणामी, यंदाही चाकरमान्यांना गणेशोत्सवाच्या प्रवासात खड्ड्यांमधूनच मार्ग काढावा लागणार आहे. या महामार्गावर काही ठिकाणी अंडरपास किंवा बोगद्यांची रचना करण्यात आली आहे. मात्र या बोगद्यांची देखभाल न झाल्याने त्यामध्ये पाणी साचणे, आणि त्यातून मोठमोठे खड्डे तयार होणे हे चित्र आहे. पेण शहरालगत असणाऱ्या रेल्वे स्थानकाजवळील बोगद्याचीही अशीच दुरवस्था झाली असून, दोन्ही दिशेने जाणाऱ्या वाहनांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.
यासंदर्भात वाहनचालकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे लक्ष वेधले आहे. पेण तालुक्यातील तरणखोप, अंतोरे फाटा, झी गार्डन हॉटेल समोर, रेल्वे स्थानक, रामवाडी, वडखळ आणि इतर बोगद्यांमधील खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
..............
वंचितकडून आंदोलनाचा इशारा
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. प्रशासनाने तत्काळ कारवाई न केल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सुनील धामणकर यांनी दिला आहे.