नाशिक, इंदिरानगर: विरुद्ध दिशेने कार चालवून आलेल्या माजी नगरसेविकेच्या पतीने समोरून आलेल्या कारला कट मारला. त्यावरून संबंधित कारचालक प्राध्यापकाने याबाबत जाब विचारला असता, माजी नगरसेविकेच्या पतीने थेट पिस्तुल रोखत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. मंगळवारी (ता.५) सकाळी इंदिरानगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नाेंद करण्यात आली. संबंधित माजी नगरसेविकेच्या पतीने सर्व आरोप फेटाळून लावत आपण पिस्तुल रोखले नसल्याचे सांगितले.
प्रा. डॉ. राहुल धीरेंद्र सिंग (रा.पाथर्डी फाटा, इंदिरानगर) यांच्या तक्रारीनुसार, मंगळवारी (ता. ५) सकाळी सात-सव्वा सातच्या दरम्यान ते इंदिरानगर परिसरातील समर्थ सहकारी बँकेसमोरील रस्त्याने त्यांच्या कारने जात होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने कारचालक व भाजपचे यशवंत निकुळे (एमएच १५ जेएम ८६८४) हे कार चालवून आले आणि त्यांनी प्रा. सिंग यांच्या कारला कट मारला. त्यामुळे प्रा. सिंग यांनी त्यांची कार थांबविली आणि कारमधील निकुळे यांना जाब विचारला. त्यावेळी त्यांनी प्रा. सिंग यांना शिवीगाळ करीत त्यांच्यावर पिस्तुल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे जबाबात सांगितले.
या प्रकाराने परिसरात नागरिकांची गर्दी झाल्याने माजी नगरसेविकेच्या पती निकुळे यांनी काढता पाय घेतला. परंतु, या प्रकरणी प्रा. सिंग हे मंगळवारी सायंकाळी इंदिरानगर पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांचा जबाब वरुन अदखलपात्र गुन्ह्याची नाेंद केली आहे. मंगळवारी सकाळी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या सर्व प्रकरणाची चांगलीच चर्चा शहरभर रंगली होती.
Eknath Shinde: ''मी लपून-छपून कामं करीत नाही'' अमित शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; इशारा कुणाकडे?माझ्याकडे शस्त्राचा परवानाच नाही : निकुळे
या प्रकरणी यशवंत निकुळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की मुलांना शाळेत सोडून जाँगिंग ट्रॅकच्या दिशेने जात होतो. त्यावेळी समोरून जोरात कार आली. मी कार बाजूला केली. त्यानंतर सदर व्यक्तीने कार खाली उतरून शिवीगाळ केली. मी त्यांच्यावर पिस्तूल रोखलेले नाही. आमच्यात फक्त बाचाबाची झाली असून, माझ्याकडे कुठल्याच शस्त्राचा परवाना नाही. त्यामुळे पिस्तूल उगारण्याचा प्रश्नच नाही. या प्रकरणी माझी बदनामी होत असल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा निकुळे यांनी दिला आहे.