Shaktipeeth Highway : कोल्हापूरकडे जमिनी फार कमी आहेत. आहेत त्या बागायती आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ‘शक्तिपीठ’ लादणार नसल्याचे आश्वस्त केले आहे. त्यामुळे कमीत कमी नुकसान कसे होईल आणि शेतकऱ्यांचे हित बघून, त्यांना विश्वासात घेऊनच हा महामार्ग केला जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुश्रीफ राष्ट्रवादीच्या युवा मेळाव्यासाठी आटपाडीत आले होते, त्यावेळी त्यांनी शक्तिपीठ महामार्ग, आलमट्टी धरणाची उंची वाढवणे आणि महादेवी हत्तीण या विषयावर पत्रकाराशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या नांदणी मठातील महादेवी हत्तिणीची देखभाल व्यवस्थित होत नसल्याप्रकरणी एक संस्था न्यायालयात गेली होती.
न्यायालयाच्या आदेशानुसार ‘वनतारा’मध्ये तिची रवानगी केली. त्यामुळे जैन समाज आणि सर्वच समाजाच्या भावना प्रक्षुब्ध झाल्या आहेत. मोर्चा निघाला होता. त्यासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी ठेवली आहे. त्याचा खर्च कार्यकर्ते करतील.’’ मुख्यमंत्र्यांनीही यासंदर्भात बैठक बोलावली आहे. या बैठकीत निश्चित काहीतरी मार्ग निघेल. प्राणी संरक्षण संस्थेच्या मनाप्रमाणे हत्तिणीचे संरक्षण करून तिला निश्चित परत आणण्याचा विश्वास व्यक्त केला.
‘‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकीत ज्या-ज्या ठिकाणी जमेल, तेथे तिन्ही पक्ष एकत्रित महायुती म्हणून लढू. जिथे जमणार नाही, तिथे स्वतंत्र लढू. मात्र, प्रत्येक ठिकाणी महायुतीचाच झेंडा फडकवण्याचा प्रयत्न राहणार आहे,’’ असेही ते म्हणाले.
Kolhapur Credit Society Scam : शासकीय सेवकांच्या पतसंस्थेत साडेसात कोटींचा अपहार, कोल्हापुरातील घटनेने खळबळ‘आलमट्टी’च्या उंचीला विरोधच’
‘‘आलमट्टी’संदर्भात दिल्लीत बैठक होती. मात्र, अडचणीमुळे जाता आले नाही. ‘आलमट्टी’ची उंची वाढवण्याला आमचा प्रचंड विरोध आहे. तरीही तसा प्रयत्न झाला, तर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी ठेवली आहे,’’ असे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
‘अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत’
प्रत्येक पक्षाला त्यांचाच मुख्यमंत्री व्हावा, अशी अपेक्षा असते. ती वावगी नाही. आम्हीही त्याला अपवाद नाही. त्यामुळे साहजिकच अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी आमचीही अपेक्षा आहे. आम्ही म्हणालो म्हणून लगेचच ते उद्या मुख्यमंत्री होणार नाहीत. भविष्यात अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांना पक्ष वाढवण्याचे आवाहन केले असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.