उद्धव ठाकरे सध्या तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. वेगवेगळ्या मुद्यांवर मतं मांडताना त्यांनी मनसेसोबत संभाव्य युती आणि एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी यावरही भाष्य केलं. राज ठाकरेंबाबत चर्चा होणार का? “राज ठाकरेंबाबत दुसऱ्यांशी चर्चा करण्याची गरज नाही. आम्ही आमचं बघू” तुम्ही दिल्लीत आहात त्याचवेळी एकनाथ शिंदे सुद्धा दिल्लीत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की, बाळासाहेबांना ज्यांनी विरोध केला त्या मार्गाने तुम्ही निघाले आहात. आम्ही लोक कल्याणकारी मार्गाने निघालो आहोत. “त्यांचे विचार आणि त्यांना उत्तर द्यायला ते महान नाहीत. गद्दारांना मी किंमत देत नाही. त्यांच्या मालकांना ते भेटायला आले असतील तर त्यावर काय बोलू शकतो” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावलाय, त्यावर उद्धव ठाकरे बोलले आहेत. “याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. ट्रम्प मोदींची थट्टा करत आहेत. खिल्ली उडवत आहे. आपण त्यांना एका अक्षराने उत्तर देत नाही. जाब विचारणं सोडा. देशाचं सरकार चालवतंय कोण?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
‘पंतप्रधान देशाचे असते तर पहलागमला गेले असते’
“शिवसेनेचा वर्धापन दिन झाला. तेव्हा मी मत व्यक्त केलं होतं. आपल्या देशाला पंतप्रधान, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री आणि गृहमंत्र्यांची गरज आहे. हे सध्या भाजपचे आहेत. पहलगाम हल्ला झाला तेव्हा मोदी बिहारला गेले. एखादा पंतप्रधान पहलगामला गेले असते. हे प्रचार मंत्री. पंतप्रधान देशाचे असते तर पहलागमला गेले असते. एकूणच हे सरकार अपयशी, असफल आणि असहाय आहे. यांना पररराष्ट्र नीती नाही. परराष्ट्र नीती अपयशी ठरली आहे” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
‘हे सरकार परराष्ट्र नीतीमध्ये अपयशी ठरलं’
“कोणतंही खंबीर धोरण नाही. अमेरिका डोळे वटारणार असताना मोदी चीनला जातात. चीनलाही मित्रासाठी नवीन डोअर उघडण्यासाठी जात आहेत. हे सरकार परराष्ट्र नीतीमध्ये अपयशी ठरलं आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.