मुंबई : गेमिंग कंपनी नझारा टेक्नॉलॉजीज आपल्या भागधारकांना मोठी भेट देण्याची तयारी करत आहे. शेअर बाजारांना पाठवलेल्या सूचनेत Nazara Technologies ने म्हटले आहे की, १२ ऑगस्ट रोजी त्यांच्या संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत केवळ भागधारकांना बोनस शेअर्स देण्यावरच विचार केला जाणार नाही, तर त्यासोबतच स्टॉक स्प्लिटच्या प्रस्तावांवरही विचार केला जाईल. गुरूवारी Nazara Technologies शेअर्समध्ये घसरण झाली. शेअर्स १,३७१.३० रुपयांवर आला आहे.
नझारा टेक्नॉलॉजीजच्या बोर्ड बैठकीत तीन महत्त्वाच्या प्रस्तावांवर चर्चा केली जाणार आहे. Bonus shares देण्याच्या प्रस्तावावर विचार केला जाईल. कंपनीचा हा आतापर्यंतचा दुसरा बोनस असेल. जून २०२२ मध्ये, नझारा टेकने १:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी केले होते. यामध्ये, प्रत्येक शेअरहोल्डरला एक बोनस शेअर देण्यात आला होता.
संचालक मंडळाच्या बैठकीत स्टॉक स्प्लिटवरही चर्चा केली जाणार आहे. सध्या, नझारा टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सची दर्शनी किंमत ४ रुपये आहे. ही कंपनीची पहिली स्टॉक स्प्लिट असेल. stock splits मुळे शेअरची किंमत कमी होते आणि शेअर्सची संख्या वाढते. यामुळे ट्रेडिंगमध्ये तरलता येते आणि लहान गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी करणे सोपे होते. बोनस आणि स्प्लिटसह कंपनीच्या जून तिमाहीच्या निकालांना १२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या बोर्ड बैठकीत मान्यता दिली जाईल. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांचे लक्ष या बैठकीवर आहे.
कंपनीने अद्याप बोनस किंवा स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाही. बोनस आणि स्टॉक स्प्लिट दोन्ही अशा कॉर्पोरेट कृती आहेत ज्या गुंतवणूकदारांसाठी आकर्षक मानल्या जातात. यामुळे केवळ शेअरहोल्डर्सची होल्डिंग वाढत नाही तर दीर्घकालीन शेअर्सची तरलता आणि मागणी देखील वाढू शकते.