T20I आणि कसोटी क्रिकेटमधून दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी निवृत्ती स्वीकारली आहे. आता ते एकदिवसीय सामन्यांसाठी मैदानावर कधी उतरतात याकडे सर्व फॅन्सचे लक्ष लागले आहे. आता हे दोन्ही दिग्गज केवळ वनडे मॅचमध्ये खेळताना दिसतील. दरम्यान या दोन्ही माजी कर्णधारांविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. काही वृत्तानुसार, रोहित आणि विराटचा हा अखेरचा सामना ठरू शकतो. हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात त्यांच्या करिअरचा अखेरचा सामना खेळतील. अर्थात याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
2027 वनडे वर्ल्ड कप विषयी नवीन रणनीती
यावर्षी विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी कसोटीतून निवृत्ती स्वीकारली. 2027 मध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. अर्थात इच्छा असली तरी त्यांचा फिटनेस, तंदुरुस्ती गरजेची ठरणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (BCCI) एका अधिकाऱ्याने सांगितले की, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या तीन सामन्यांच्या एक दिवसीय मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा हे अखेरचा सामना खेळताना दिसतील. कारण BCCI 2027 मध्ये वनडे वर्ल्ड कपसाठी तरुणांना संधी देण्याची अधिक शक्यता असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
विजय हजारे ट्रॉफीत खेळण्याची शक्यता
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर हे दोन्ही खेळाडू इच्छुक असतील तर ते वनडे फॉर्म्याटमधील विजय हजारे ट्रॉफीत राज्यनिहाय क्रिकेट खेळू शकतात. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत अत्यंक खराब खेळी केली होती. त्यानंतर त्यांना रणजी ट्रॉफीत खेळावे लागले. पण हे दोन्ही खेळाडू येथेही काही करिष्मा करू शकले नाहीत. त्यानंतर दोघांनी कसोटीतून निवृत्ती स्वीकारली. कदाचित हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीच हा आपला शेवटचा एकदिवसीय सामना मालिका असल्याचे घोषीत करतील, अशी शक्यता ही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली. रोहित शर्मा आणि विराट कोहली यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियासाठी मैदानात उतरले होते.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (एकदिवसीय सामना)
19 ऑक्टोबर : पहिला वनडे (पर्थ)
23 ऑक्टोबर : दुसरी वनडे (एडिलेड)
25 ऑक्टोबर: तिसरी वनडे (सिडनी)