आपलं आयुष्य अतिशय क्षणभंगुर आहे, याचा पदोपदी प्रत्यय येत असतो. आज हसतखेळत असलेला इसमा उद्या दिसेलच याची शाश्वती नाही. पुढल्या क्षणाला काय होईल याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. निशबाचा खेळ समजत नाही. अशीच एक हृदयद्रावक, मन हेलावून टाकणारी घटना नागपूरमध्ये घडली आहे. तिथे एका इसमाला त्याच्या पत्नीचा वियोग सहन करावा लागला, धक्कादायक गोष्ट म्हणजे अपघातात पत्नी गेल्यावर कोणीच त्याच्या मदतीला आलं नाही. अखेर त्याला त्याच्याच बाईकवरून पत्नीचा मृतदेह न्यावा लागला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून पाहणाऱ्याच्या डोळ्यातले अश्रू थांबतच नाहीत. माणूसकी नावाचा काही प्रकार उरला आहे की नाही, असा सवालही यामुळे उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी नागपुर-जबलपुर नॅशनल हायवेवर ही दुर्दैवी घटना घडली. रस्ते अपघातात पत्नीच्या मृत्यूनंतर अमित यादव हादरलेच. त्यांनी मदतीसाठी येणाऱ्या जाणाऱ्यांकडे खूप मदत मागितली, पण एकही गाडी थांबली नाही. अखेर हताश होऊन त्याने पत्नीचा मृतदेह त्याच्या बाईकवरच बांधला आणि तसंच मध्य प्रदेशमधील आपल्या घरी जायचं ठरवलं. वेदनादायक घटनेचा व्हिडीोही खूप व्हायरल झाला आहे.
अपघातानंतर पत्नीने सोडले प्राण
मृत महिलेचे नाव ग्यारसी यादव (वय 32) असे आहे. तिच्या पतीचे नाव अमित यादव आहे. देवलापार पोलीस स्टेशन हद्दीतील मोरफाटा परिसरात दुपारी 12 वाजताच्या सुमारास ही घटना घडली, ज्यामध्ये एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने ग्यारसीचा जागीच मृत्यू झाला. हे जोडपे मूळचे मध्य प्रदेशातील सिवनी येथील आहे आणि 10 वर्षांपासून नागपूरजवळील लोणारा येथे राहत होते.
रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी पत्नीसोबत लोणाराहून करणपूरला जात असलेल्या अमित यांच्या बाईकला एका ट्रकने अचानक कट मारला. मागे बसलेली अमित यांची पत्नी ग्यारसी ही खाली कोसळली आणि पाहता पाहता ट्रकच्या चाकांखाली चिरडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र अपघातानंतर ट्रक चालक एक क्षणही तिथे थांबला नाही.
पत्नीचा मृत्यू झाल्याने पाहून अमित हादरला, स्तब्ध झाला. त्याने रडत रडतच त्या मार्गावरून जाणाऱ्या अनेकांकडून मदत मागितील, लोकांना थांबवण्याचा प्रयत्नही केला. मात्र कोणीच थांबल नाही. एकाही इसमाने गाडी थांबवून, खाली उतरून त्याची मदत केलीच नाही. असहाय्य आणि एकट्या पडलेल्या, अमितने एक कठीण, वेदनादायक निर्णय घेतला. त्याने आपल्या पत्नीचा मृतदेह त्याच्या मोटारसायकलला बांधला आणि गावी निघून गेला.
हायवेवरून तो पत्नीचा मृतदेह घेऊन जाताना अनेकांना दिसला, त्याचा व्हिडीही काहींनी रेकॉर्ड केला. हे दृश्य पाहणाऱ्यांसाठी विचित्र आणि धक्कादायक होते. हा माणूस असे का करत आहे हे कोणालाही समजत नव्हते. भीती आणि धक्क्याने ग्रासलेल्या अमितने त्याची बाईक थांबवली नाही. यावेळी हायवे पोलिसांनी अमितला पाहून, त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु अमित थांबलाच नाही. अखेर पोलिसांनी त्याला कसंबसं थांबवले आणि मृतदेह ताब्यात घेतला. चौकशी करून अखेर अमित यांच्या पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरच्या मेयो रुग्णालयात पाठवला.