विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला लागलेली गळती सुरूच आहे. पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. मात्र आता त्यापूर्वीच राज्यात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी देखील महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीची वाट धरल्याचं पाहायला मिळत आहे. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे, आणि त्यानंतर काँग्रेसचा नंबर लागतो, काँग्रेसमधल्या देखील अनेक नेत्यांनी महायुतीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे.
दरम्यान आज आता काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. जळगावातील काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आदिवासी नेत्या म्हणून ओळख असलेल्या काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दोन वर्षांपूर्वीच प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता व त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती, मात्र त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर
काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान आता शिंदे या राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लवकरच अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रतिभा शिंदे यांचा प्रवेश होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीचं या निवडणुकांबाबत अद्याप कुठलंही चित्र स्पष्ट झालेलं नाहीये. त्यातच महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के सुरूच आहेत. घटक पक्षांना लागलेली गळती थांबवण्याचं मोठं आव्हान महाविकास आघाडीसमोर असणार आहे. तर दुसरीकडे महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे, याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये होऊ शकतो.