पुण्यात आणखी एक हुंडाबळीची घटना घडली असून एका २७ वर्षीय विवाहितेनं गळफास घेत आत्महत्या केलीय. रक्षाबंधनला भाऊ रिकाम्या हाताने आला तर जीवे मारून टाकू अशी धमकी विवाहितेला देण्यात आली होती. स्नेहा विशाल झेंडगे असं आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचं नाव आहे. या प्रकरणी महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या लोकांविरोदात तक्रार दाखल केली आहे.
स्नेहा आंबेगाव बुद्रुक इथं राहत होती. माहेरहून पैसे आणण्यासाठी तिचा छळ केला जात होता असा आरोप वडिलांनी केलाय. या प्रकरणी स्नेहाचा नवरा विशाल, सासरे संजय झेंडगे, सासू विठाबाई झेंडगे, दीर विनायक झेंडगे, नणंद तेजश्री थिटे, तिचा पती परमेश्वर थिटे, सासऱ्यांचे साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
बाळराजे, रक्षाबंधनाच्या दिवशीच तुझं जाणं वेदनादायक; लाडक्या भावाला अखेरचा निरोप, रुपाली चाकणकरांवर शोककळापुण्यात आंबेगाव पठार इथं घरी स्नेहानं गळफास घेतला. स्नेहाच्या वडिलांनी म्हटलं की, आम्ही झेडगे कुटुंबाच्या मागणीनुसार लग्न लावून दिलं. लग्नानंतर ते काही दिवस मोहोळला आणि नंतर पुण्यात राहण्यासाठी आले. स्नेहाच्या नवऱ्यानं शेतजमीनीसाठी पैसे मागितले. तेव्हा ५ लाख रुपये दिले. पुण्यात ते कुठे राहतात हे आम्हाला सांगितलं नव्हतं. झेंडगे यांची वेळू इथं कंपनीही आहे. तिथं स्नेहाचे भाऊ गेले असता त्यांना हाकलण्यात आल्याचा आरोपही स्नेहाच्या वडिलांनी केलाय.
स्नेहा आणि विशालचं २०२४ मध्ये लग्न झालं होतं. लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून वेगवेगळ्या कारणांनी त्रास दिला गेला. कंपनी सुरू करण्यासाठी २० लाखांची मागणी करण्यात आली. स्नेहावर दबाव टाकला जायचा. पैशांसाठी मानसिक, शारीरिक छळ केला गेला. मारहाण, शिवीगाळ केली जायची असा आरोप स्नेहाच्या वडिलांनी तक्रारीत केला आहे.
स्नेहाने सततच्या त्रासाला कंटाळून पोलिसात तक्रारही केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सासऱ्यांचा साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांनी तो मागे घ्यायला लावला. स्नेहा यानंतर नेहमी तणावातच होती. छळ, पैशांची मागणी, मारहाण यामुळे ती खचली होती. शेवटी ९ ऑगस्टला तिनं घरात कुणी नसताना गळफास घेत आत्महत्या केली.