न्यूझीलंड क्रिकेट टीमने झिंबाब्वे विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर भक्कम पकड मिळवली आहे. न्यूझीलंडने झिंबाब्वेला पहिल्याच दिवशी अवघ्या 125 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर न्यूझीलंडने दुसर्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 600 पार मजल मारली आहे. न्यूझीलंडने 130 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 601 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडने अशाप्रकारे पहिल्या डावात 476 धावांची आघाडी मिळवली आहे. न्यूझीलंडसाठी ओपनर डेव्हॉन कॉनव्हे याच्यानंतर हेनरी निकोल्स आणि रचीन रवींद्र या जोडीने दीडशतकी खेळी केली. तर विल यंग आणि जेकब डफी या दोघांनीही योगदान दिलं.
न्यूझीलंडची बॅटिंग
न्यूझीलंडने 125 धावांच्या प्रत्युत्तरात दीडशतकी भागदारी करत झिंबाब्वेला मागे टाकलं आणि आघाडी घेतली. कॉनव्हे आणि विल यंग या दोघांनी 162 ची ओपनिंग पार्टनरशीप केली. त्यानंतर विल यंग 74 धावांवर आऊट झाला. त्यानंतर झिंबाब्वेने न्यूझीलंडला 235 धावांवर दुसरा झटका दिला. जेकब डफी याने 36 धावांचं योगदान दिलं.
तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी
त्यानंतर हेनरी निकोलस आणि डेव्हॉन कॉनव्हे या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 110 धावा जोडल्या. न्यूझीलंडने 345 धावावंर तिसरी विकेट गमावली. डेव्हॉन कॉनव्हे आऊट झाला. कॉनव्हेने 245 चेंडूत 18 चौकारांच्या मदतीने 153 धावा केल्या.
त्यानंतर हेनरी निकोलस आणि रचीन रवींद्र या दोघांनी झिंबाब्वेच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. या जोडीने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद 256 धावांची भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी दीडशतकी खेळी केली. दोघेही खेळ संपला तेव्हा नाबाद परतले. निकोलसने 245 बॉलमध्ये 61.22 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 150 धावा केल्या. हेनरीने या खेळीत 15 चौकार लगावले. तर रचीन रवींद्र यानेही धमाका केला. रचीनने 139 बॉलमध्ये 118.71 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 165 रन्स केल्या आहेत. रचीनने या खेळीत 21 फोर आणि 2 सिक्स लगावले.
मॅट हॅनरीचा पंजा
त्याआधी यजमान झिंबाब्वेला पहिल्या डावात 48.5 ओव्हरमध्ये 125 धावाच करता आल्या. झिंबाब्वेसाठी ब्रेंडन टेलर याने सर्वाधिक 44 धावा केल्या. तर ताफाड्झवा त्सिगा याने 33 धावांचं योगदान दिलं. न्यूझीलंडसाठी मॅट हेनरी याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. मॅटची या मालिकेत 5 विकेट्स घेण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली. तसेच झॅकरी फॉल्क्स याने मॅटला चांगली साथ दिली. झॅकरीने चौघांना बाद केलं. तर मॅथ्यू फिशर याने 1 विकेट घेत दोघांना चांगली साथ दिली.