राज्यात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आल्याचे आपण पाहिलं आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युती करणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र त्यापूर्वी होणाऱ्या बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी युती केली आहे.
मनसे-ठाकरे गटाची युतीबेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधुची युती झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ठाकरे गटाची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांनी युती केली आहे. बेस्टच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी उत्कर्ष पॅनल म्हणून उभं केलं आहे. या निवडणूकीसाठी आज दुपारी 4 पर्यत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. काही अर्ज मागे घेतल्यानंतर आता या युतीचं जागावाटप समोर आलं आहे.
मनसे किती जागा लढवणार?बेस्टच्या पतपेढी निवडणुकीसाठी 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीतील जागावाटप आता समोर आलेले आहे. बेस्टच्या निवडणुकीत 21 जागापैकी ठाकरेंची सेना 19 तर मनसे 2 जागा उत्कर्ष पॅनल म्हणून एकत्रित लढणार आहे. यातून ठाकरे गट हा मोठा भाऊ ठरला आहे. तर राज ठाकरेंच्या पक्षाला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे. आता या ही निवडणूक जिंकण्यासाठी 11 जागा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
yuti
महापालिकेतही युती होणार?बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधुची युती झाल्याने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही या दोन्ही पक्षांची युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ठाकरे गट आणि मनसे युतीबाबत कार्यकर्ते आणि नेते आग्रही असल्याची माहिती समोर आलेली आहे. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हेही या युतीबाबत सकारात्मक असल्याचे समोर आलेले आहे. मात्र या युतीची कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दोन्ही पक्षांची युती झाल्यास शिवसेनेला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.